कंत्राटदार जाणार खड्ड्यात, रस्त्यावर खड्डा पडल्यास कंत्राटदाराला दंड

मुंबईत वारंवार निर्माण होणारा खड्डय़ांचा मनस्ताप कमी करण्यासाठी कंत्राटदारांसाठी कठोर निर्णय घेण्यात येणार आहेत. यात ‘डीएलपी’ (डिफेक्ट लायबेलिटी पिरीएड) मध्ये म्हणजेच ‘हमी कालावधी’त रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदाराला रोख दंड करण्यात येणार आहे. आगामी काळात देण्यात येणाऱ्या कंत्राटांमध्ये या अटीचा समावेश करण्यात येईल. आतापर्यंत कंत्राटदारांवर ‘हमी कालावधी’त खड्डय़ांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी होती. मात्र नव्या अटीमुळे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार कि.मी.चे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे धोरणही पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. यात सुमारे 400 कि.मी. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पालिकेकडून कार्यवाहीदेखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात रस्त्यावर खड्डे पडूच नये यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी पाच वर्षांचा तर डांबरी रस्त्यांना तीन वर्षांचा ‘हमी कालावधी’ असतो. या ‘हमी कालावधी’त रस्त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराने करणे आवश्यक असते. मात्र आता खड्डे पडूच नये यासाठी कंत्राटदारांना कठोर नियमावली तयार करणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले.

पावसाळ्याआधी मास्टीक तंत्रज्ञानाने दुरुस्ती

मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टीक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.

यामुळे फक्त खड्डा बुजवण्याचे काम न होता संपूर्ण रस्ताच नव्या स्वरूपात तयार होणार आहे. खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स अपयशी ठरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मास्टीक डांबरीकणात 180 ते 200 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते. ते सर्वात जलद गतीने स्थिर होते. ते कोल्डमिस्कपेक्षा पावसाळ्यातही टिकाव धरते आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारे असते. त्यामुळे कोल्डमिस्कऐवजी मास्टीट अस्फाल्टचा वापर करणार.

गल्ली बोळातील खड्डय़ांसाठीही मास्टीक वापरणार

गल्लीबोळातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जातो. मात्र आता बारा इंचापेक्षा मोठा खड्डाही मास्टीकने बुजवला जाणार आहे. मास्टीकमुळे खड्डे पुन्हा कधीच उखडणार नाहीत, असा पालिकेचा दावा आहे.