धोकादायक फांद्या तोडा; दोन हजार सोसायट्यांना नोटीस; महापालिकेकडून आतापर्यंत 12 हजार 467 वृक्षांची छाटणी

पावसाळय़ात धोकादायक फांद्या पडून होणाऱया दुर्घटनांमध्ये होणारी जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी पालिका सतर्क झाली असून उद्यान विभागाने पालिका क्षेत्रातील 12 हजार 467 वृक्षांची छाटणी पूर्ण केली असून 7 जूनपर्यंत उर्वरित एक लाख 11 हजार 670 झाडांची छाटणी पूर्ण करण्यात येणार आहे. तर गृहनिर्माण संस्था, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा मिळून 1 हजार 855 जणांना नोटीस बजावण्यात आली असून आपल्या परिसरातील धोकादायक फांद्या तोडण्याचे निर्देश दिले आहेत.

यंदा मुंबई महानगरात एकूण एक लाख 11 हजार 670 झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट आहे. पैकी 12 हजार 467 झाडांची छाटणी झाली आहे. 7 जून 2024 अखेरपर्यंत उर्वरित 99 हजार 203 झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. उद्यान खात्याकडून करण्यात येणारी कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. त्यानुसार उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या देखरेखीखाली कामे सुरू आहेत.

अशी सुरू आहे कार्यवाही
– महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 29 लाख 75 हजार झाडे आहेत. यापैकी 15 लाख 51 हजार 132 एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत, तर 10 लाख 67 हजार 641 एवढी झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण वृक्षांपैकी 1 लाख 85 हजार 964 झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत.

– या प्रक्रियेनुसार उद्यान विभागाने यंदा मुंबईतील आकाराने मोठय़ा अशा सुमारे 1 लाख 86 हजार 246 वृक्षांचे सर्वेक्षण केले. त्यात रस्त्यांच्या कडेला सुमारे 1 लाख 11 हजार 670 झाडे आहेत. 5 एप्रिल 2024 पर्यंत 12 हजार 467 झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे.

– गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय – निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱया झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते.