हसत हसत जमवलं!

>> निनाद पाटील

आपल्यासोबत काम करणाऱया सहकाऱयांना त्यांच्या गरजेच्या वेळी अलवारपणे कसं जपावं हे हास्यजत्राच्या टीमकडून शिकले. त्यामुळेच हसत हसत सगळं जमवलंसांगतेय अभिनेत्री नम्रता संभेराव.

आजही चांगलाच आठवणीत आहे मला तो दिवस. शाळेत होते तेव्हा मी मैदानी स्पर्धांमध्ये आवर्जून भाग घ्यायचे. कबड्डी, खो-खो, लंगडी, तीन पायांची शर्यत अशा अनेक स्पर्धांमध्ये  हिरिरीने भाग घेऊन मी नाव कमावलं होतं. समूह गायन स्पर्धेतही भाग घेऊन चमकले होते, अभिनयाशी संबंध आलाच नव्हता. कारण कधीच एकपात्री अभिनय किंवा भाषण असं काही केलं नव्हतं.

एका वर्षी एकपात्री स्पर्धा होती आणि माझ्या वर्गातील काही मैत्रिणींनी भाग घेतला होता. त्यांचे पाठांतर, ती धडाडी हे सारं पाहून मला असं वाटलं की, अरे या तर माझ्याच मैत्रिणी आहेत. मग त्या जे करू शकतात ते मी का नाही करू शकत? माझ्या शिक्षकांनी, मित्रमैत्रिणींनी पण मला प्रोत्साहन दिलं. मग मी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि चक्क द्वितीय पारितोषिक पटकावलं. त्यानंतर मात्र मी मागे वळून पाहिलं नाही. एक वेगळाच आत्मविश्वास माझ्या अंगात भिनला. ज्याचा पुढे मला खूप उपयोग झाला. त्या क्षणी तो ‘पुश’ अत्यंत महत्त्वाचा होता, ती पॉझिटिव्हिटी मला देणं गरजेचं होतं, जे माझ्या मैत्रिणी आणि शिक्षकांनी दिलं. किती साधी गोष्ट आहे, सोपीसुद्धा आहे. आपल्याला जे येतं ते दुसऱयाला यावं म्हणून त्याला प्रोत्साहित करावं आणि एक मानसिक आधार द्यावा हे मी शिकले.

 जेव्हा ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ करत होते, सहा हजार स्पर्धकांतून निवडल्या गेलेल्या 24 जणांमध्ये मी होते. याचा मला आजही आनंद व अभिमान आहे आणि राहील. त्या वेळेला सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही सर्वार्थाने ‘गुरू’ असलेली दोन माणसं माझ्या आयुष्यात आली. त्यांनी मला प्रचंड शिकवलं. आज इतकी वर्षे झाली, मी त्यांच्या सोबत निरनिराळय़ा प्रोजेक्टवर काम करतेय, पण दर दिवसागणिक त्यांच्याकडून काहीतरी नवनवीन शिकायला मिळत हे मात्र खरं. या दोघांचं मला आवडलेलं वैशिष्टय़ म्हणजे, काळानुसार ते स्वतःमध्ये बदल घडवत असतात. मला हे खूप भारी वाटतं.

‘हास्यजत्रा’च्या एका सीझनच्या दरम्यान मी प्रेग्नेंट होते. त्या वेळेला वाटलं… काय करावं? जमेल ना मला हे? होईल ना माझ्याने… आणि या विचाराने माझा आत्मविश्वास थोडा डळमळीत झाला होता. माझा सहकलाकार मित्र प्रसाद खांडेकर याने ही अडचण अचूक ओळखली आणि मला कमी धावपळ, दगदग कमी होईल असे सीन लिहिले. अशा पद्धतीने ते सादर केले गेले, जेणेकरून माझी दमछाक नाही होणार. आपल्यासोबत काम करणाऱया सहकाऱयांना त्यांच्या गरजेच्या वेळी अलवारपणे कसं जपावं हे मी प्रसादकडून शिकले. हा पाठिंबा त्या वेळी माझ्यासाठी लाखमोलाचा होता.

मला मुलगा झाला आणि चार-पाच महिन्यांनी जेव्हा मी जॉइन झाले तेव्हा माझं वजन वाढलं होतं. चेहरा गोल गरगरीत झाला होता. हावभाव हवे तसे ‘शार्प’ येत नव्हते. वजन वाढल्यामुळे मला दमायला होत होतं. एनर्जी कमी झाली होती आणि मग का कोण जाणे, मला असं वाटलं की, मला हे नाही जमणार. सोडते मी ‘हास्यजत्रा’. मी हा विचार बोलून दाखवल्याक्षणीच मोटे आणि गोस्वामी सरांनी मला समजून घेतलं. ते म्हणाले की, हा एक फेज आहे, त्यापासून पळून जाणं योग्य नाहीये. तू आता आई झाली आहेस म्हणून ती जबाबदारी तुला घरातून खुणावते आहे आणि ती तू समर्थपणे सांभाळत आहेसच, पण लक्षात ठेव, तू एक गुणी कलाकार आहेस. त्याच्यामुळे दोन्ही जबाबदाऱया तू फार समर्थपणे सांभाळशील याची आम्हाला खात्री आहे. तुला उशिरा यायचंय सेटवर किंवा लवकर जायचंय, तर सांग, तुझ्या येण्या-जाण्याच्या वेळा सांभाळून आपण शूट करू.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूव्ह ऑन करत राहायला पाहिजे  आणि तू तर फायटर आहेस ना नमा!

 हे सारं ऐकल्यावर माझा निर्णय मी बदलला.

त्यांनी मला ‘हास्यजत्रा’ सोडण्याच्या निर्णयापासून परावृत्त केलं. माझ्या जाण्याच्या वेळा सांभाळल्या.

 आज या निर्णयावर विचार करते, तेव्हा मला खूप समाधान वाटतं. खूप शिकवलं या साऱयांनी. एखादी व्यक्ती जेव्हा अडचणीत असेल तेव्हा आपण आपल्याला जमेल तशी मदत कशी करू शकतो? सोडणं, तोडणं हे फार सोपं आहे, पण जोडणे तितकंच कठीण हे मला कळलं.

औपचारिक वाटेल कदाचित. आज यानिमित्ताने प्रसाद, मोटे सर, गोस्वामी सर या साऱयांना मी धन्यवाद म्हणतेय

‘हास्यजत्रा’च्या एका सीझनच्या दरम्यान मी प्रेग्नेंट होते. त्या वेळेला वाटलं… काय करावं? जमेल ना मला हे? होईल ना माझ्याने… आणि या विचाराने त्यावेळी माझा आत्मविश्वास थोडा डळमळीत झाला होता. पण जमवलं…