अमर्त्य सेन ठणठणीत, निधन झाल्याची अफवा! नंदना सेनने दिली माहिती

नोबेल पुरस्काराने सन्मानित असलेले प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याचं वृत्त काही वेळापूर्वी प्रसारित झालं होतं. मात्र, सेन यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती त्यांची मुलगी अभिनेत्री नंदना सेन यांनी दिली आहे.

सेन यांना 1998 साली अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले हिंदुस्थानी आहेत. सेन यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 साली झाला. त्याचं संपूर्ण बालपण विश्वभारती कॅम्पसमध्ये केलं. प्रसिद्ध संस्कृतज्ञ क्षिती सेन या त्यांच्या आजी होत्या. रविंद्रनाथ टागोर यांनी डॉ. अमर्त्य सेन यांचं नाव ठेवल्याचं बोललं जातं. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात पीएचडी पूर्ण केली. ते हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते. तर हिंदुस्थानात ते जादवपूर विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षणसंस्थांमध्येही त्यांनी काही काळ अध्यापन केलं.

सध्या ते मुलीसोबत केंब्रिज येथे राहत आहेत. त्यांच्या निधनाबाबत अफवा पसरली असून बाबांची प्रकृती उत्तम आहे. आम्ही सुट्ट्यांचा आनंद घेत असून बाबा हार्वर्डमध्ये शिकवण्याचं आणि त्यांच्या आगामी पुस्तकाचं काम करत असतात, असंही ती म्हणाली आहे.