शरद पवारांनी बोलावली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; अजित पवारांनी पक्ष, चिन्हावर दावा केल्यानंतर हालचालींना वेग

अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज गुरुवारी दुपारी तीन वाजता ही बैठक पार पडणार आहे. शरद पवारांसह सुप्रिया सुळे आणि पवारांशी एकनिष्ठ असणारे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये पुढील पक्षाची पुढील रणनीती आणि कायदेशीर संघर्षावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड करून थेट ‘ईडी’ सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर अजित पवारांनी राजभवन येथे उपमुख्यमंत्री, तर बंडखोर आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर बुधवारी अजित पवार आणि शरद पवार यांनी ‘पॉवर’फूल शक्तिप्रदर्शन केले. मात्र ‘ईडी’ सरकारमध्ये सामील होण्याआधीच 30 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून शरद पवार यांना हटवून त्याजागी अजित पवार यांची निवड करण्यात आली होती, अशी बाब आता समोर आली आहे.

अजित पवार गटाने तसा ई-मेल आज केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला असून 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले प्रतिज्ञापत्र जोडत अख्खा राष्ट्रवादी पक्ष आणि घडय़ाळ या निशाणीवरही दावा सांगितला आहे. दरम्यान, आमची बाजू ऐकल्याशिवाय पक्ष आणि निशाणीवर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती शरद पवार यांच्यावतीने कॅव्हेटद्वारे आयोगाकडे करण्यात आली आहे.