तिकीट मिळताच नवनीत राणांचा सूर पालटला; बावनकुळेंनाच बाहेरचे म्हणून हिणवलं

Lok Sabha Election 2024 – भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपची उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणांचा सूर पालटल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बाहेरचे लोक अशा शब्दांत हिणवलं आहे.

माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राणांनी नवरा-बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये, असं म्हणत बावनकुळेंनाच टोला हाणला. माध्यम प्रतिनिधींनी राणा यांना त्यांचे पती भाजपमध्ये येणार आहेत का, यावरून प्रश्न विचारला होता. तसंच बावनकुळे यांच्या विधानाचा संदर्भही दिला होता. त्यावर राणांनी ही प्रतिक्रिया दिली.

नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पती रवी राणा जे सध्या युवा स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आहेत, तेही भाजपमध्ये येतील, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. याच विधानावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या की, मी रवी राणा यांची पत्नी म्हणून एवढच सांगते की, मी भाजपमध्ये आज कार्यकर्ता म्हणून काम करतेय. माझ्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. मी माझा निर्णय माझ्या मर्जीने घेतला, तसाच रवी हे त्यांच्या मर्जीने त्यांचा निर्णय घेतील. बाहेरच्या लोकांनी नवरा बायकोमध्ये बोलू नये हेच बरं आहे, अशी प्रतिक्रिया राणा यांनी दिली.