80-90 टक्के आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत; चिन्हाचा फैसला ऑक्टोबरमध्ये होणार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे 80 ते 90 टक्के आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत असल्याचे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा गट मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच काळापासून कार्यरत आहे. अनेकदा आमचे काही आमदारही निवडून आले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने उतरू. सर्व जागांवर नाही, पण ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत, ती जागा आम्ही लढवू, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

चिन्हाचा अद्याप निर्णय झालेला नाही? असे माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की, चिन्हाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये होईल. निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होतील. चिन्हाचा निर्णय होण्याआधीच आम्ही निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करू. निवडणुका सुरू होण्याआधी चिन्हाचा निर्णय होईल, अशी आम्हाला आशा आहे.

चिन्हाबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण आमदार आणि सर्व राज्यातील 80 ते 90 टक्के पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असेही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.