गावित येताच भाजप पदाधिकाऱ्यांचा वॉकआऊट, पालघरमध्ये मिंधे गटाच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध

पालघर लोकसभा मतदारसंघावर मिंधे गटाने दावा केला असला तरी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला खोके सरकारमधील भाजपचाच कडाडून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. विक्रमगडच्या औसरकर सभागृहात झालेल्या बैठकीसाठी गावित येत असल्याचे पाहताच उपस्थित असलेल्या भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट वॉकआऊट करत घरचा रस्ता धरला. त्यामुळे आधीच उमेदवारीसाठी जीव टांगणीला लागलेल्या गावितांना आता उघडपणे विरोध होऊ लागल्याने त्यांची मोठी गोची झाली आहे.

पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल याचा अद्याप तिढा सुटलेला नाही. मिंधे गटाचे राजेंद्र गावित यांनी संभाव्य उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी भाजपच्या वसईतील कार्यकत्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र पाठवत गावितांच्या उमेदवारीला विरोध केला असल्याचे बोलले जात आहे. त्यातच भाजप, मिंधे व अजित पवार गटातील कार्यकर्त्यांच्या झालेल्या विक्रमगडमधील बैठकीतूनही गावित यांना विरोध असल्याचे दिसून आले. या

बैठकीसाठी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पावडे, मनसेचे योगेश पाटील तसेच अन्य पदाधिकारी आले होते. यावेळी चर्चा सुरू असतानाच काही वेळेनंतर आपल्या काही समर्थकांसह गावित बैठकीच्या ठिकाणी आले. हे पाहताच संतप्त झालेल्या भाजप व मिंधे गटातीलच काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे या सभागृहातील निम्म्याहून खुर्चा रिकाम्या झाल्या.

गावितांना आमच्यावर का लादता? भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने खासगीत बोलताना सांगितले राजेंद्र गावित हे आमच्यावर विनाकारण लादले जात आहेत. ते पाच वर्षांपासून मतदारांच्या संपर्कात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पालघरकरांची नाराजी आहे. अशा परिस्थितीत गावितांना उमेदवारी दिल्यास त्याचा जबरदस्त फटका बसेल. त्यापेक्षा अन्य कोणताही उमेदवार द्या, त्याचे आम्ही काम करू असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.