न्हावाशेवामध्ये ड्रायव्हरना ठार मारतात तिकडे जाऊ नका! अफवा पसरवणाऱ्या पंकज गिरीला बडोदामधून अटक

न्हावा शेवा बंदर परिसरात गाड्या घेऊन जाऊ नका, तिकडे एका सरपंचाच्या मुलाचा अपघातात जीव गेल्याने ट्रकचालकाला कापून टाकतात. आतापर्यंत चाळीस ड्रायव्हर ठार मारले आहे अशी अफवा पसरवून महाराष्ट्राची गुजरातमध्ये बदनामी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बदोडा येथून पंकज गिरी याला अटक केली आहे. या भामट्याची चौकशी सुरू असून वाहनचालकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन न्हावाशेवा पोलिसांनी केले आहे.

आधीच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत त्यामुळे नोकरदारवर्गावर बेरोजगारीची वेळ आली आहे. असे असताना गुजरातमधील बडोदा येथे राहणाऱ्या पंकज गिरी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राची बदनामी सुरू केली आहे. रायगड येथील न्हावाशेवा पोर्ट येथे वाहनचालकांना अक्षरशः कापून टाकले जात आहे. त्यामुळे चालकांनी तिथे जाऊ नये असा व्हिडीओ गिरी याने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडीओमुळे बंदरात वाहतूक व्यवसायाचे तीनतेरा वाजले. दरम्यान, पोलिसांना व्हिडीओ हाती लागल्यानंतर टीम तयार करून आरोपी पंकज गिरीला बडोदा येथून अटक केली.

ऐकीव माहितीद्वारे अफवा पसरवली

तपासामध्ये आरोपीने ऐकीव माहितीद्वारे अफवा पसरवली असल्याचे समोर आले. मात्र आरोपीने यावर माफी मागितली असली तरी कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्हावाशेवा पोर्ट येथे दररोज हजारो वाहनांची वाहतूक होत असते. अफवा पसरवणाऱ्या खोट्या व्हिडीओमुळे पोर्टमध्ये येणाऱ्या ट्रकचालकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, अशी माहिती स्वतः ट्रकचालकांनी जवळच असलेल्या पोलिसांना दिली.