पीयुष गोयल यांना मासळीचा वास नकोसा; प्रचारादरम्यान नाकातोंडाला लावतात रुमाल, उत्तर मुंबईतील मतदारांमध्ये तीव्र नाराजी

रेल्वेमंत्री पियूष गोयल पुन्हा मंत्री बनणार

Lok Sabha election 2024: उत्तर मुंबई मतदारसंघात तब्बल 32 टक्के मराठी मतदार असून यात गावठाणे, कोळीवाडय़ामधील कोळी भूमिपुत्रांचा समावेश लाखोंच्या घरात आहे. मात्र महायुतीचे उमेदवार पीयुष गोयल यांना कोळीवाडे, गावठाण आणि मच्छीमार्पेट परिसरातील मासळीच्या वासामुळे या ठिकाणी प्रचार करणे कठीण होऊन बसले आहे. बाभळी नाका येथील मच्छीमार्पेट आणि गावठाणमध्ये प्रचार करताना याचा प्रत्यय आलाय. गोयल यांनी या ठिकाणी नाकातोंडाला अक्षरशः रुमाल लावून कसातरी प्रचार उरकल्याचे समजते. विशेष म्हणजे, आता अशा ठिकाणांचा प्रचार पत्नी आणि मुलावर सोपवल्याचेही कळते.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय यांच्या सोसायटय़ा आहेत. त्याचप्रमाणे झोपडपट्टी आणि मच्छीमारांची गावठाणेही आहेत. बोरिवलीतील बाभई आणि वझिरा या गावठाणमध्ये प्रचार पीयुष गोयल यांनी मच्छीचा वास सहन न झाल्याने या प्रचार यात्रेच्या दरम्यान नाकाला रुमाल लावूनच प्रचार केला. मात्र त्यांचे हे वर्तन स्थानिक मच्छीमारांना अपमानास्पद वाटले. अशा पद्धतीचे वर्तन जर गोयल करत असतील तर निवडून आल्यावर आपल्याला भेटणार कसे, आमचे प्रश्न सोडवणार कसे असा सवाल उपस्थित होत असून नाराजीही व्यक्त होत आहे. त्यामुळे याचा फटका गोयल यांना बसणार असल्याचे बोलले जात आहे.

झोपडपट्टीवासीयांना हद्दपार करण्याचा डाव

पीयुष गोयल यांनी एका मुलाखतीत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा मेगा प्लॅन मांडला. यामध्ये मुंबईतील सर्व झोपडपट्टीवासीयांना मिठागराच्या जागेत घरे बांधून देण्याचा मानस व्यक्त केला. मात्र यामुळे उत्तर मुंबईत पिढय़ान्पिढय़ा राहणारे कोळी बांधव, गावठाणे आणि झोपडपट्टीमधील रहिवासी प्रचंड संतापला आहे. आमची हक्काची जागा दलालांना देऊन आम्हाला बेघर करण्याचा हा डाव असल्याचा संताप उत्तर मुंबईवासीय करीत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर झाले ‘बोरिवलीकर’

गोयल यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून भाजपमध्ये स्थानिक विरुद्ध उपरे असा वाद निर्माण झाला आहे. यातच गोयल यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बोरिवली पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या टाटा पॉवर हाऊस येथील ‘ऑबेरॉय स्काय’ या नामांकित आणि प्रीमिअम समजल्या जाणाऱया निवासी संकुलात आलिशान घर घेऊन आपण बोरिवलीकर बनण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मतदार बाहेरचा उमेदवार असल्याने नाराज आहेत.