स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भित्तिशिल्प हटवण्यासाठी भाजपच्या मंत्र्याचा दबाव

रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मालाडच्या लिबर्टी गार्डन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भित्तिशिल्प हटवण्याचा निर्णय पालिकेच्या पी उत्तर विभागाने घेतला आहे. भाजपचे आमदार तसेच उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दबावाखाली हा संतापजनक प्रकार घडत असल्याने हेच का भाजपचे सावरकरांविषयीचे प्रेम, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिकांसह शिवसैनिकांनी याला तीव्र विरोध केला आहे.

मालाड पश्चिमेच्या लिबर्टी गार्डन येथील मामलेदार वाडी मार्ग आणि बी. जे. पटेल मार्ग या टी आकाराच्या जंक्शनवर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहे. 1987 साली तत्कालीन शिवसेना नगरसेवक मधुकर राऊत यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भित्तिशिल्पाचे अनावरण करण्यात आले. 2001 साली प्रभाग समिती अध्यक्ष अशोक पटेल यांच्या पुढाकाराने या शिल्पाचे सुशोभीकरण करून त्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. रस्ता रुंदीकरणाचे कारण देत आता हे भित्तिचित्र इतरत्र हलवण्यात येणार असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

…अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भित्तिशिल्प अन्यत्र हलवण्याचा पालिकेचा विचार आहे. पालकमंत्री लोढा यांच्या दबावाखाली हा संतापजनक प्रकार सुरू असून नागरिकांचा याला तीव्र विरोध आहे. रस्ता रुंदीकरणानंतर लिबर्टी गार्डनलगतच हे भित्तिशिल्प असावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात आम्ही पालिकेच्या पी उत्तर विभागाचे उपअभियंता आणि सहाय्यक पर्यवेक्षण अधिकारी यांना कळविले आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मालाड विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक पटेल यांनी दिला आहे.