मानधन व शालार्थसाठी शिक्षकांची बोर्डासमोर निदर्शने

बारावी परीक्षेच्या निकालादिवशीच परीक्षेच्या कामाचे शिक्षकांना मिळणारे मानधन अद्याप दिलेले नाही. तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळालेल्या शिक्षकांना वेतन सुरू होण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक दिलेला नाही. याविरोधात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मुंबई विभागीय मंडळाच्या वाशी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

बारावीचा निकाल लागून आता दोन महिने झाले तसेच शिक्षकांनी परीक्षेचे काम संपवून तीन महिने होतील. तरीदेखील परीक्षा कामाचे मानधन मिळालेले नाही. तसेच शिक्षकांना एका महिन्यात शालार्थ क्रमांक देण्याबाबत मान आयुक्तांच्या सूचना आहेत, परंतु शिक्षकांना वेळेत शालार्थ क्रमांक मिळत नाहीत. शिक्षकांना त्वरित मानधन देण्यात यावे. शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिह्यांतील 200 हून अधिक शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. संघटनेच्या वतीने सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सचिव डॉ. सुभाष बोरसे यांना मागण्यांचे निवेदन दिले.