दहशत माजविणाऱ्या शेंडगे टोळीवर मोक्का, खडक पोलिसांची कारवाई

जबरी चोरी, दरोडा, जिवे मारण्याची धमकी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत राहुल शेंडगे टोळीवर खडक पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत करण्यात आलेली ही 54 वी कारवाई आहे.

राहुल दत्तु शेंडगे (वय-21 , रा. लोहीयानगर), करण ऊर्फ ठोंब्या भानुदास आगलावे (21), लखन भानुदास आगलावे (22 ), महेश इंद्रजित आगलावे (24), विशाल ऊर्फ लल्ल्या ऊर्फ लक्ष्मण भारत पारधे (21), शंकर आण्णा कोंगाडी (25), रोहन दत्तु शेडगे (24) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या अल्पवयीन साथीदारांचा समावेश आहे. फिर्यादी हे टिंबर मार्केट मधील एका ऑफीस जवळ मित्रासोबत्त गप्पा मारत उभे होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या राहुल शेंडगे व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला मारहाण केली. धारधार हत्याराने वार करुन गंभीर जखमी करून सदर परिसरात नागरिकामध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

राहुल शेंडगे यांचे पुर्व रेकॉर्डची पाहणी करता त्याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये सुधारणा होत नसल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने यांनी आरोपींवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्यामार्फत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला पाटील यांनी मंजुरी दिली.