शिरुरमध्ये पराभवाच्या भीतीने आढळरावांना पुढे केले; रोहित पवार यांचा अजितदादांवर हल्ला

शिरुरची जागा उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा पक्षातील एका बडय़ा नेत्याला लढवायची होती. मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यापुढे त्यांचा टीकाव लागणार नाही. कोल्हे असा सर्व्हे आला त्यामुळे बरीच शोधाशोध करूनही कोणीच मिळालं नाही. म्हणून त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुढे केले, असा जोरदार हल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी चढवला.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते. त्यामुळे ते ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते, मात्र अजित पवारांना उमेदवार सापडला नसल्याने त्यांनी आढळरावांना याबाबत विचारले असता, ते तिसऱयांदा पक्ष बदलून निवडणुकीत उतरले आहेत. पण, काही झाले तरी डॉ. अमोल कोल्हे यांच्यापुढे त्यांचा टीकाव लागणार नाही, असा टोला रोहीत पवार यांनी अजितदादांना लगावला.

भाजपकडून ईडीची भीती

भाजपने ईडीची भीती दाखवून पक्षात घेतले, नेत्यांनीही तुरुंगापेक्षा भाजप बरा असे म्हणत पक्ष प्रवेश केला. हे आता सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार भाजपच्या या अनाजी पंती वृत्तीला तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रोहीत पवार यांनी दिला.