जालन्यात अवैध गुटख्याच्या साठ्यावर छापा; 81 हजारांचा गुटखा जप्त

जालना शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध उपविभागीय पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यामुळे अवैध धंदे चालविणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. डीवायएसपी सांगळे यांनी आपल्या अधिपत्याखाली पिंक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचीन इंगेवाड यांचे एक पथक स्थापन केले असून या पथकामार्फत अवैध वाळू वाहतूक- उत्खनन, मटका, जुगार, गुटखा अशा सर्व अवैध धंद्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे.

डीवायएसपी यांचे पथक आणि कदीम जालनाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने मंगळवारी रात्री संयुक्तरित्या कारवाई करीत नरिमाननगरातील गुटखा माफिया शेख शकील शेख रईस याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलीस धाड टाकणार असल्याची कुणकुण लागताच शकील घराला कुलूप लावून पसार झाला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्याशी वारंवार मोबाईलवर संपर्क करूनही घरी न आल्यामुळे शेवटी पंचसमक्ष घराचे कुलूप तोडून झाडाझडती घेतली. यावेळी चार मोठ्या गोण्यांमध्ये असलेला विविध कंपन्यांचा 81 हजार 750 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पदमने, डीवायएसपी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस कर्मचारी कैलास जावळे, राठोड, कांगणे, डोईफोडे, चंदेल आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी केली आहे.

ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली असून याप्रकरणात तक्रार नोंदविण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क पोलिसामार्फत साधण्यात आला आहे. बुधवारी दुपारपर्यंत या अधिकार्‍यांना तक्रार करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. त्यामुळे एफडीएच्या अधिकार्‍यांचे शहर आणि जिल्ह्यातील गुटखामाफियांसोबत लागेबांधे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जालना शहरातील प्रत्येक भागात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. भोकरदन नाका, लक्कडकोट, गांधीचमन, मुक्तेश्वरवेश, संभाजी उद्यानासमोरील पान टपर्‍या, अंबड चौफुली, शिवाजी पुतळा परिसर, बसस्थानक, रेल्वे स्थानक रोड आदी भागातील टपर्‍या बिनदक्कत कुणालाही न भिता गुटख्याची विक्री करतात. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकार्‍यांचे गुटखा विक्रीला पाठबळ असल्याची चर्चा आहे.