रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून तिढा वाढला; उमेदवारीबाबत संयम राखा, राणे-सामंतांना वरिष्ठांची तंबी

Lok Sabha election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये तिढा वाढतच चालला आहे. भाजपचे विद्यमान राज्यसभा सदस्य नारायण राणे व शिंदे गटाचे किरण सामंत या दोघांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा हट्टा कायम ठेवला आहे. अखेरीस या दोघांनाही संयम राखण्याची तंबी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे; पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशांना न जुमानता नारायण राणे व किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत.

या मतदारसंघातून नारायण राणे निवडणूक लढवण्यास आग्रही आहेत. मात्र दुसरीकडे शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. त्यामुळे महायुतीतील संबंध ताणले गेले आहेत. या जागेवरून स्थानिक पातळीवर भाजप व शिंदे गटात राडा होण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी जाहीर झालेली नाही तरी नारायण राणे यांनी प्रचारसभा सुरु केल्या आहेत. दुसरीकडे किरण सामंत यांनी ‘कोणाच्या बापाला ऐकणार नाही’ असा नारायण राणे यांना थेट इशारा देणारा स्टेटस ठेवला होता.

या दोघांमधील जाहीर वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी किरण सामंत हे नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी झालेल्या चर्चेतही किरण सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा हेका कायम ठेवला; पण देवेंद्र फडणवीस यांनी किरण सामंत यांना तंबी दिली आणि शांत राहण्याचा सल्ला दिला. या जागेच्या तिकिटाच्या तिढय़ावर लवकरच तोडगा काढण्यात येईल. तोपर्यंत संयम राखण्याचे आदेश दिले आहेत.

अंतिम निर्णय दिल्लीतून

या दोघांमधील वाद मिटवण्यास स्थानिक पातळीवरील नेत्यांना अपयश आल्याने आता पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मतदारसघांतील उमेदवाराचा अंतिम निर्णय घेतील असे वृत्त आहे.

दोघांनी घेतले उमेदवारी अर्ज

फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर किरण सामंत माघार घेतील असे चित्र निर्माण झाले होते; पण या बैठकीच्या काही तासांतच किरण सामंत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी चार उमेदवारी अर्ज विकत घेतले. दुसरीकडे नारायण राणे यांनीही याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. नारायण राणे यांनीही चार उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत.