रोखठोक – नेभळट, डरपोकांच्या देशात

देशापेक्षा पंतप्रधान मोठे होणे यालाच हुकूमशाही म्हणायचे. आज देशात तेच झाले. भाजपात गुलाम व डरपोक लोक एकत्र झाले आहेत. ईडी, सीबीआयच्या भयाने जे लटपटले ते सरळ भाजपात गेले. हा देश कधीकाळी शूरांचा व लढणाऱ्यांचा होता. भाजपच्या राजकारणाने हा देश नेभळटांचा व डरपोकांचा केला!

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी व त्यांच्या भाजपकडे प्रचंड पैसा आणि सत्ता आहे. त्या जोरावर ते सांगतात, या वेळी आम्ही चारशेच्या वर खासदार जिंकून आणू, ही भयंकर हुकूमशाहीच आहे. पंतप्रधान जिंकून येणाऱ्या जागांचा आकडा आधी देतो हे एक प्रकारे ‘फिक्सिंग’ आहे. देशात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री मोदीविरोधी आहेत म्हणून त्यांना तुरंगात बंद केले. ज्यांची जागा खरोखरच तुरुंगात असायला हवी असे अनेक भ्रष्टाचारी भाजपात जाऊन सुरक्षित झाले. हे सर्व थांबवायचे तर मतदारांनी उत्साह दाखवायला हवा. मतदानाचा अधिकार ज्यांना आहे त्यांनी मतदान केलेच पाहिजे. सामान्य माणसाच्या हातात आता फक्त एकच अधिकार उरला आहे आणि तो म्हणजे मत देण्याचा अधिकार! आज आपल्या पंतप्रधानांना वाटते, मोदी नावाचा माणूस देशापेक्षा मोठा आहे. मोदी यांच्या अंधभक्तांनाही तेच वाटते. देशापेक्षा मोदी मोठे आहेत. मोदी हेच न्यायालय, संसद व स्वातंत्र्य. मोदी हेच विष्णू व श्रीराम या मानसिकतेचे भाजपचे लोक आहेत. हा विचार धोकादायक आहे. देशाच्या नेतृत्वात सर्वात मोठा गुण जो आवश्यक असतो तो परिस्थितीची जाणीव बाळगणारा मनाचा मोठेपणा. महाभारतातील एक कथा फार विदारक आहे. कुंतीपुत्राने कुंतीला विचारले की, “मोठेपणा मिळविण्यासाठी मी काय करू? धनुर्विद्येचा चमत्कार दाखवू? गदायुद्धाने डोळे दिपवू? ताकदीने पर्वत हलवू?” कुंतीने उत्तर दिले की, “मन मोठे कर, म्हणजे मोठा होशील!” मोदी-भाजप कंपनीने जास्तीत जास्त क्षुद्र मनाचे प्रदर्शन केले आहे आणि देशहिताचे यत्किंचितही भान राखलेले नाही. मोदी काळ हा देशाच्या बरबादीचाच काळ आहे. ही बरबादी तीन देशद्रोही करीत आहेत. विद्वेषाची आग सर्वत्र लावणारे धर्मपिसाट, माथेफिरू, पैसा व सत्तालोभाने अंध झालेले मोदीभक्त, राजकारणी, काळ्या पैशाने देश पोखरणारे मक्तेदार, भांडवलदार आणि त्यांचे दलाल बुद्धिवंत. या तिघा शत्रूंनी देशावर संकट आणले आहे. या तीन शत्रूंशी आता धाडसाने व निकराने लढावे लागेल.

घरात बसले

ईडी, सीबीआयला घाबरून अनेक जण घरात बसले आहेत तर अनेकांनी ‘पक्षांतर’ केले व मोदींच्या भजन मंडळात दाखल झाले. जे देशाला संकटात टाकून पळून गेले ते सर्व पळपुटे म्हणून इतिहासात नोंदविले जातील. जगविख्यात नाटककार शेक्सपियर याने ज्युलियस सीझरच्या तोंडी मर्दानगीचे फार सुंदर संवाद टाकले आहेत. सीझरची पत्नी पालपर्निया हिला भयानक स्वप्न पडले म्हणून ती सीझरला वारंवार विनवणी करते की, “तू बाहेर जाऊ नकोस, कारण तुझा खून होणार असा धोका आहे. माझी मनोदेवता मला सांगते, तू आज बाहेर पडू नकोस!” सीझर तिच्या विनवण्या फेटाळतो आणि सांगतो –

“Cowards die many times before their deaths; The valiant never taste of death but once. Of all the wonders that I yet have heard, It seems to me most strange the men should fear; Seeing that death, a necessary end, Will come when it will come.”

भ्याड माणसे भीतीनेच
मरणापूर्वीच हजारदा मरतात
शूरवीर फक्त एकदाच
मृत्यूची चव चाखतात
जन्मला तो मरणारच
जायचे तेव्हा जाणारच
सारे समजूनही माणसे
मृत्यूला भितात का?
चमत्कारांची अजब दुनिया
सर्वात नवलाची ही किमया
सारे समजूनही माणसे
मृत्यूला भितात का?

माणसे आज मृत्यूला कमी आणि ईडी, सीबीआयला जास्त भितात. असे सगळे भित्रे लोक भाजपात सामील झाले. त्यामुळे भाजप हा भ्याड लोकांचा ‘गट’ बनला आहे. मृत्यूला, तुरुंगाला जे घाबरले ते राष्ट्राचे कधीच झाले नाहीत. इंदिरा गांधी, राजीव गांधी मृत्यूला घाबरले नाहीत. विरोधकांनाही घाबरले नाहीत व घाबरले म्हणून विरोधकांना तुरुंगात डांबले नाही. आणीबाणीतील कालखंड अपवाद होता.

लढणाऱ्यांचे स्मरण

भारत देश अभंग राहिला पाहिजे. भारतात लोकशाही व स्वातंत्र्य टिकावे म्हणून आज जे लढत आहेत त्यांचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा हे अशा कडक सुरक्षा घेऱ्यात फिरत असतात की जणू ते युद्धावरच निघाले आहेत. लोकशाहीवादी देशात फक्त हुकूमशहालाच भीती वाटत असते. महाराष्ट्रात ज्यांनी पक्षांतर केले त्या सगळ्य़ांना सरकारने सुरक्षेसाठी गाड्या व शस्त्रधारी पोलीस पुरवले. गल्लीतला त्यांचा कार्यकर्ताही दोन सशस्त्र पोलीस घेऊन फिरताना दिसतो. कारण त्याने पैसे घेऊन पक्ष बदललेला असतो. हे इतके भय कशासाठी?

आापरेशन ‘ब्लू स्टार’नंतर शीख समाज इंदिरा गांधींविरुद्ध गेला. एका कार्पामात एका विदेशी पत्रकाराने इंदिरा गांधी यांना प्रश्न विचारला की, “सर्व शीख तुमच्याविरुद्ध आहेत ना?” इंदिराजींनी शांतपणे उत्तर दिले, “माझे येथे रक्षक कोण आहेत ते तुम्हाला दिसत नाही का?” त्या विदेशी पत्रकाराचे त्यांनी रक्षकाकडे लक्ष वेधले. तो रक्षक शीख होता. हा शीख रक्षक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बियांतसिंग होता. ज्याने इंदिराजींवर पहिली गोळी झाडली. शीख अंगरक्षक ठेवू नका. खलिस्तान्यांपासून धोका आहे, असे गुप्तचरांनी सांगूनही पंतप्रधान गांधी यांनी ऐकले नाही. एखाद्या समाजावर अविश्वास ठेवणे म्हणजे देशाच्या अखंडतेला तडे देणे. शीख समाज विरोधात गेला तरी त्यांनी आपला शीख अंगरक्षक बदलला नाही. यालाच म्हणतात 56 इंचाची छाती! सध्याचे पंतप्रधान मोदी हे हिंसाचारग्रस्त मणिपूरला गेले नाहीत. लडाखच्या संघर्षभूमीवर गेले नाहीत. भारत हा वीरांची आणि शूरांची पूजा करणारा देश आहे. मोदी काळात ‘डरपोकां’ची पैदास जास्त झाली. जे सर्व डरपोक भाजपात सामील झाले.

असे हे आदर्श नेते

काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते भाजपात सामील झाले. ईडी, सीबीआयच्या भीतीने लटपटले व भाजपात गेले. हे आदर्श नेते दिल्लीत जाऊन सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्यासमोर रडले व ‘पक्ष सोडला नाही तर तुरुंगात जावे लागेल. तुरुंगात जाण्याची माझी इच्छा नाही,’ असे हात जोडून सांगितले व हे आदर्श नेते काँग्रेस सोडून भाजपात गेले. अशा अनेक ‘डरपोक’ लोकांना प्रवेश देऊन भाजपने काय साध्य केले? या देशातील भोंगळ राजकारण यापुढे बंद पाडले पाहिजे. कारण देश अशा एका टप्प्यावर आला आहे की, ज्याला मूलभूत क्रांतिकारक बदल हवा आहे. त्याला व्यक्तिद्वेषाचे आणि बदल्याचे राजकारण नको. डोळ्यासमोर देश विकला जात असताना डरपोकांच्या कळपात सामील होणे आता कुणालाच नकोय. वैचारिक व एकात्मतेच्या राजकारणासाठी देश भुकेलेला आहे. पंक्चर झालेल्या टायरसारखे सध्याचे पंतप्रधान मोदी दहा वर्षे व्यासपीठ अडवून भोंगळ भाषणे करीत आहेत. ही भाषणे व त्यांचे तर्क उबग आणणारे आहेत. या तर्कांना पूर्णविराम देणारी आजची निवडणूक आहे. शूरांचा देश डरपोकांचा देश झाला. पवित्र देश पाप्यांच्या हाती गेला. हरिश्चंद्रांचा देश हरामखोरांचा झाला. याविरोधात जे लढतील त्यांना देश सलाम करील!

Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]