खूशखबर… मुंबईतील आरटीई प्रवेशाच्या जागा वाढल्या

‘आरटीई’ अंतर्गत महापालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये होणाऱया 25 टक्के कोटा प्रवेशासाठीच्या मुंबईतील जागांमध्ये यंदा वाढ झाली आहे. आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणीला सुरुवात झाली असून मुंबईतील 1383 पात्र शाळांमधील 29 हजार 14 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश पंकाळ यांनी स्पष्ट केले.

अर्ज भरण्यासाठी वेबसाईट – https://student.maharashtra.gov.in/admÀortal

तर दुसऱयांदा प्रवेश घेता येणार नाही

ज्या बालकांनी यापूर्वीच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, अशी सूचना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी केली आहे.

 यंदा तब्बल 1 हजार शाळा, तर 22 हजार जागांमध्ये वाढ

आरटीई अंतर्गत मुंबईतील एस.एस.सी. बोर्डाच्या 1319 तर अन्य 64 अशा मिळून 1383 पात्र शाळांमध्ये प्रवेशासाठी 29 हजार 14 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये एस.एस.सी. बोर्ड 27 हजार 869 तर अन्य 1145 जागांचा समावेश आहे. यापूर्वी ही प्रक्रिया फक्त विनाअनुदानीत खासगी शाळांसाठी लागू असायची. मात्र या वर्षीपासून या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा तब्बल 1 हजार शाळांची वाढ झाली आहे. तर जवळपास 20 हजार जागादेखील वाढल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता घरापासून 1 किलोमीटरच्या आत असणाऱया शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.