सामना अग्रलेख – दिवाळी पाडवा! आनंद, भरभराट, उत्साह

दिवाळी सगळ्यांची गोड असावी. दिवाळी सगळ्यांनाच आरोग्याची, भरभराटीची असावी. दिवाळीचा आनंद एकतर्फी नसावा. दिवाळीच्या उत्साहात सगळ्यांनीच सामील व्हावे. पंतप्रधान लष्करी रंगभूषेत सैन्यतळावर जातात, तसे एका दिवाळीत त्यांनी खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जावे व कृषीप्रधान भारताच्या राष्ट्रनिर्मात्याची दुःखद कहाणी समजून घ्यावी. असंख्य शेतकऱ्यांच्या घरांत साधी पणतीही पेटलेली नाही. 2024 ची दिवाळी, पाडवा आजच्यापेक्षा मंगलमय, तेजोमय, जवानांबरोबर किसानांच्याही भरभराटीचा येवो, याच आजच्या दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

यंदा दिवाळीत तसा उत्साह दिसत आहे व लोकांनी मनापासून सण साजरा करण्याचे ठरवले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘दिवाळी पहाट’चे बहारदार कार्यक्रम पार पडले व लोकांनी संगीत, कला, नाट्य अशा कार्यक्रमांचा भरपूर आस्वाद घेतला. बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. प्रदूषणाने हवा बिघडली तरी मुंबईत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साधारण पावणे दोनशे कोटींचे फटाके फोडण्यात आले. धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणे हजारभर कोटी रुपयांची सोने खरेदी झाली. गेल्या चार दिवसांत 550 कोटींचे फटाके खरेदी झाले. सोन्या-चांदीच्या दुकानांत, पेढ्यांवर प्रचंड गर्दी आहे. कपडे, फराळ, सुका मेवा यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. आपले पंतप्रधान मोदी हे लष्करी गणवेषात जवानांबरोबर दिवाळी साजरी करताना दिसले. हिमाचल प्रदेशातील लेपचा येथील लष्करी तळावर पंतप्रधान पोहोचले. त्यांनी जवानांसोबत फराळ केला व देशाला माहीत नसलेली वेगळीच माहिती दिली. राष्ट्रनिर्माणात सैन्याचे योगदान अमूल्य असल्याची माहिती मोदी यांनी दिली. सैन्य आहे म्हणून आपला देश सुरक्षित आहे हे कुणालाच माहीत नसेल. सैन्यतळावर जाऊन आपल्या पंतप्रधानांनी नवे काय सांगितले? पण ठीक आहे. मंगलमय, चैतन्यदायी अशा या दीपोत्सवात सगळ्यांनीच सहभागी व्हायचे आहे व या दिवाळीत

लोकांचा मूड

दिसतो आहे. आज दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आहे. राष्ट्रनिर्माणात सैन्याइतकेच ‘बळी’चे म्हणजे शेतकऱ्यांचेही योगदान तितकेच अमूल्य आहे. दिवाळी पाडवा हा काही व्यापारीवर्गाचा उत्सव नाही. लक्ष्मीप्राप्तीसाठी हिशेब ठिशेब वह्यांचे चोपडी पूजन करून व्यापारी नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या सुरू केल्या जातात. मुहूर्ताचे व्यवहार होतात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा अर्थात श्रीकृष्ण, विष्णूच्या मंदिरात पूजाअर्चा होते. दिवाळी पाडव्याचा दिवसदेखील मंगलमय, तितकाच शौर्याची प्रेरणा देणारा आहे. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या आजच्या दिवशी होतो. राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले. त्यांचा पराभव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. या दिवसास साडेतीन मुहूर्ताचे वैभव आहे, पण या वैभवात आमच्या बळीराजाला कोणी विसरू नये. ‘ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात बळीराजाचा बळी देऊन राज्य चालवले जात आहे. निसर्ग झोडत आहे व राजा मारत आहे. अशा कोंडीत सापडलेला बळीराजा चांगल्या दिवसाच्या प्रतीक्षेत येणारा दिवस ढकलत आहे. जोपर्यंत बळीराजास सुखाचे दिवस येत नाहीत, तोपर्यंत दिवाळी आणि पाडवा खऱ्या अर्थाने तेजोमय होणार नाही. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यांचे मुख्यमंत्री ‘पाडव्या’स शुभेच्छा देतात व आपापल्या

बंगल्यांच्या आवारात

थाटात सण साजरे करतात. बळीराजा मात्र बांधावर विमनस्कपणे बसून नुकसान झालेल्या पिकाकडे पाहत असतो. सीमेवरील सैनिकाला राष्ट्रनिर्माणाचे योगदान म्हणून ‘पगार’, ‘पेन्शन’ मिळते. बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबास पेन्शन मिळते, पण बळीराजा व त्याचे कुटुंब सदैव निराधार म्हणून जगते. बळीराजा व त्यांची पोरे शेवटी कंटाळून आत्महत्या करतात व त्यांच्या कुटुंबास नंतर जे भोग भोगावे लागतात ते भयंकर असतात. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ही वेदना कुणीतरी मांडायला हवीच म्हणून ती मांडली. आकाशात लक्ष लक्ष दिव्यांची आरास होते ती दुष्ट शक्तींचा विनाश होण्यासाठीच. त्या प्रकाशात प्रगतीच्या पाऊलवाटा स्पष्ट दिसाव्यात व त्याच पाऊलवाटेवरून पुढचा प्रवास व्हावा हाच या वेळच्या दिवाळी पाडव्याचा मंगलमय संदेश असावा. दिवाळी सगळ्यांची गोड असावी. दिवाळी सगळ्यांनाच आरोग्याची, भरभराटीची असावी. दिवाळीचा आनंद एकतर्फी नसावा. दिवाळीच्या उत्साहात सगळ्यांनीच सामील व्हावे. पंतप्रधान लष्करी रंगभूषेत सैन्यतळावर जातात, तसे एका दिवाळीत त्यांनी खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जावे व कृषीप्रधान भारताच्या राष्ट्रनिर्मात्याची दुःखद कहाणी समजून घ्यावी. असंख्य शेतकऱ्यांच्या घरांत साधी पणतीही पेटलेली नाही. 2024 ची दिवाळी, पाडवा आजच्यापेक्षा मंगलमय, तेजोमय, जवानांबरोबर किसानांच्याही भरभराटीचा येवो, याच आजच्या दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!