सामना अग्रलेख – वीज दरवाढीचे चटके

पंतप्रधान मोदी सध्या प्रत्येक जाहीर सभेत ‘पंतप्रधान सूर्योदय योजने’चे गोडवे गात आहेत. त्यामुळे सामान्यांचे वीज बिल कसे शून्यावर येईल, अशी स्वप्ने दाखवीत आहेत. वीज बिल शून्य व्हायचे तेव्हा होईल, परंतु तुम्ही सामान्यांच्या मासिक खर्चात दोन शून्यांची वाढ केली आहे, या वास्तवाचे काय? दिल्लीतील ‘आप’ सरकारने वीज दरवाढ केली म्हणून बोंब मारणारा भाजप महाराष्ट्रातील त्यांच्याच सरकारने केलेल्या वीज दरवाढीबद्दल मूग गिळून का बसला आहे? वीज दरवाढीचे चटके जनतेला बसणार असले तरी त्याचा ‘तडाखा’ लोकसभा निवडणुकीत सरकारला बसणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी आश्वासनांचे रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडत आहेत. विकासकामांचे पोकळ ढोल वाजवीत आहेत. मागील दहा वर्षांत इतर क्षेत्रांप्रमाणेच ऊर्जा क्षेत्रातदेखील देशाने कशी क्रांती केली, याचेही दाखले ही मंडळी देत आहेत. पण मग ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सामान्य जनतेला वीज दरवाढीचा शॉक देण्याची आफत का आली? या प्रश्नावर मात्र या मंडळींची दातखिळी बसली आहे. पुन्हा ही वाढ 1 एप्रिलपासून लागूदेखील करण्यात आली आहे. एवढ्या घाईघाईत वीज दरवाढीचा वरवंटा महाराष्ट्रातील सामान्य जनतेवर फिरविण्याची अशी कोणती ‘आणीबाणी’ राज्यातील मिंधे सरकारवर आली? वीज नियामक आयोगाने दरवाढीला होकार दिला आणि राज्य सरकार लगेच ‘महावितरण’ला देकार देऊन मोकळे झाले. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांवर वीज बिलाचा बोजा दरमहा 10 ते 65 रुपयांनी वाढणार आहे. शेतकऱयांसाठी ही दरवाढ 20 ते 30 पैसे प्रति युनिट असेल. व्यावसायिक, औद्योगिक वीज ग्राहक, रुग्णालये यांनादेखील या दरवाढीचा फटका बसणार आहे. रस्त्यांवरील पथदिव्यांसाठी आता 129 रुपयांऐवजी 142 रुपये आकारले जाणार असल्याने त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

करवृद्धीमध्ये

होणार हे उघड आहे. म्हणजे घरगुती वीजवापरासह सर्वच क्षेत्रांना या दरवाढीचा तडाखा बसणार आहे आणि आधीच महागाईच्या वणव्यात होरपळणारा सामान्य माणूस या वीज दरवाढीने पुरताच भाजून निघणार आहे. मिंधे सरकारने या दरवाढीचा मुहूर्तही काढला तो 1 एप्रिलचा. यंदा मार्चपासूनच उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. त्यात एप्रिल आणि मे महिन्यात तीव्र उष्णतेच्या लाटेला तोंड द्यावे लागेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. म्हणजे सामान्य माणसाला दरवाढीचा बोजा सहन करून विजेचा जास्तीचा वापर करण्याशिवाय गत्यंतरच उरलेले नाही. इंधन खरेदीसाठी जास्त खर्च येत असल्याने वीज दरवाढीशिवाय पर्याय नव्हता, अशी बतावणी सरकार आणि महावितरण करीत आहे. प्रश्न इतकाच आहे की, ऐन उन्हाळ्यात हा दरवाढीचा चटका जनतेला देण्याएवढी तुम्हाला काय ‘इमर्जन्सी’ होती? उन्हाळ्यात असेही सर्वच जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळफळावळ यांचे दर वाढलेले असतात. इतर खर्चदेखील वाढलेला असतो. त्यात वीज दरवाढीचा बोजा सामान्यांच्या माथी मारून तुम्हाला कुठला आनंद मिळाला? पुन्हा वाढीव स्थिर आकाराला इंधन अधिभार जोडला तर ही

दरवाढ 10 टक्क्यांपर्यंत

जाईल. एकीकडे मोदी राजवटीने सर्वसामान्यांचे जीवन कसे सुसह्य वगैरे केले अशा बाता मारायच्या आणि दुसरीकडे वीज दरवाढीचा शॉक ऐन उन्हाळ्यात देऊन त्यांचे जीवन ‘असह्य’ करायचे. केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत यांची हीच बनवाबनवी आणि जुमलेबाजी सुरू आहे. पंतप्रधान मोदी तर सध्या त्यांच्या प्रत्येक जाहीर सभेत ‘पंतप्रधान सूर्योदय योजने’चे गोडवे गात आहेत. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना कशी क्रांतिकारी आहे, त्यामुळे सामान्यांचे वीज बिल कसे शून्यावर येईल, अशी स्वप्ने दाखवीत आहेत. वीज बिल शून्य व्हायचे तेव्हा होईल, परंतु आता तुम्ही सामान्यांच्या मासिक खर्चात दोन शून्यांची वाढ केली आहे, या वास्तवाचे काय? दिल्लीतील ‘आप’ सरकारने वीज दरवाढ केली म्हणून बोंब मारणारा भाजप महाराष्ट्रातील त्यांच्याच सरकारने केलेल्या वीज दरवाढीबद्दल मूग गिळून का बसला आहे? लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत वीज दरवाढीचा ‘शॉक’ जनतेला जाणवणार नाही, असे जर सत्ताधाऱयांना वाटत असेल तर ते ‘नंदनवना’त वावरत आहेत. वीज दरवाढीचे चटके जनतेला बसणार असले तरी त्याचा ‘तडाखा’ निवडणुकीत सरकारला बसणार आहे. आज तुम्ही जनतेला आगीत ढकलले आहे, पण उद्या फुफाटय़ात तुम्ही पडणार आहात!