सामना अग्रलेख – भूकंप आणि सुरुंग!

गेले काही दिवस महाराष्ट्रातील पुढारी राजकीय भूकंपाची भाकिते वर्तवत आहेत. पक्ष फोडणे किंवा आमदार-खासदार विकत घेणे हेच सध्या भूकंपाचे लक्षण मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि या जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात खऱ्याखुऱ्या भूकंपाचा धक्का बसला. गुरुवारी सकाळी झालेल्या धरणीकंपाच्या दोन हादऱ्यांनी जनतेमध्ये भयाचे वातावरण आहे. भूकंपामुळे मराठवाड्यातील जनतेची झोप उडालेली असताना सरकार मात्र राजकीय पक्ष व नेत्यांमध्ये सुरुंग पेरून, फोडाफोडी करून रोज नवे राजकीय भूकंप करण्याच्या वल्गना करण्यातच रमले आहे!

सध्याचे दिवस हे तथाकथित राजकीय भूकंपाचे बार उडवण्याचे दिसत आहेत. म्हणजे राजकीय भूकंप होवो अथवा न होवो, पण तशी भाकिते वर्तवून बढाया मारण्याचे हे दिवस आहेत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ‘माइंड गेम’ खेळण्यासाठी भूकंपाच्या अफवांनी राजकीय बाजार गरम केला जात असतानाच गुरुवारी सकाळी मराठवाड्याचे तीन जिल्हे मात्र भूकंपाच्या खऱ्याखुऱ्या धक्क्यांनी हादरले. हिंगोली, नांदेड, परभणी आणि मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात दूरवरपर्यंत या भूकंपाचे हादरे जाणवले. सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी नोंदवली गेली. या हादऱ्याने घरातील कपाटे, काचेची तावदाने, खिडक्या यांचा अचानक खडखडाट झाला. खासकरून लोखंडी पत्र्याची छते असणाऱ्या घरांमध्ये तर हा आवाज अधिकच मोठा होता. तब्बल 6 सेकंद हा धरणीकंप सुरू होता. या धक्क्याने साखरझोपेत असलेले लोक खडबडून जागे झाले. हा भूकंप आहे, हे कळल्यानंतर त्या धक्क्यातून लोक सावरतही नाहीत तोच 11 मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का बसला. भूकंपमापक यंत्रावर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल नोंदवली गेली. लागोपाठ बसलेल्या दोन हादऱ्यांनी

घाबरलेले लोक

घराबाहेर पळत सुटले. या दोन्ही भूकंपांचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात जांब-रामेश्वर तांडा भागात आहे. या दोन्ही भूकंपांची खोली दहा किलोमीटर इतकी असल्यामुळे सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र या भूकंपाने कच्च्या व कुडाच्या अनेक घरांना तडे गेले आहेत. एक-दोन ठिकाणी घरेही पडली; मात्र त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. हिंगोली शहर व जिल्ह्यातील तब्बल 700 गावांनी या भूकंपाचे हादरे अनुभवले. कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत व हिंगोली तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये भूकंपाने दहशत निर्माण केली. नांदेड व परभणी जिल्ह्यांतही हीच परिस्थिती होती. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद भागात व बीड जिल्ह्याच्या काही गावांतही हे धक्के जाणवले. नांदेड शहर, अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यांतील बहुतांश गावे भूकंपाच्या दोन्ही धक्क्यांनी हादरली. याच महिन्यात 3 मार्च रोजीदेखील नांदेड शहरात 1.5 रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद झाली होती. वास्तविक नांदेड व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत. हिंगोली जिल्ह्यात 2019 पासून आतापर्यंत तब्बल 18 वेळा भूकंपाची नोंद झाली, तर 100 हून अधिक वेळेस भूगर्भातून रहस्यमय आवाज आले. नांदेड शहर व परिसरातही गेली काही वर्षे अशाच

धक्क्यांचे सत्र

सुरू आहे. नागरिकांनी याविषयी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला माहिती कळवल्यानंतर या कक्षाने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पत्रे पाठवून माहिती कळवण्याची औपचारिकता तेवढी पूर्ण केली. मात्र भूगर्भातून येणारे भीतीदायक आवाज आणि भूकंपाचे धक्के भविष्यात किती धोकादायक ठरू शकतात, याविषयी अभ्यास करून जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणे व खबरदारीच्या उपायांबाबत जागरुकता निर्माण करणे, या दृष्टीने कुठलेही काम सततच्या भूकंपांनी त्रस्त झालेल्या नांदेड व हिंगोली जिल्ह्यात होताना दिसत नाही. 1993 साली लातुरातही नेमके हेच घडले. 12 हजारांहून अधिक बळी घेणाऱ्या महासंहारक भूकंपापूर्वी छोट्या-मोठ्या धक्क्यांची मालिका किल्लारी व सास्तूर परिसरात सुरू होती. आज तीच परिस्थिती नांदेड व हिंगोली जिल्ह्यावर ओढवली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील पुढारी राजकीय भूकंपाची भाकिते वर्तवत आहेत. पक्ष फोडणे किंवा आमदार-खासदार विकत घेणे हेच सध्या भूकंपाचे लक्षण मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी आणि या जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात खऱ्याखुऱ्या भूकंपाचा धक्का बसला. गुरुवारी सकाळी झालेल्या धरणीकंपाच्या दोन हादऱ्यांनी जनतेमध्ये भयाचे वातावरण आहे. भूकंपामुळे मराठवाड्यातील जनतेची झोप उडालेली असताना सरकार मात्र राजकीय पक्ष व नेत्यांमध्ये सुरुंग पेरून, फोडाफोडी करून रोज नवे राजकीय भूकंप करण्याच्या वल्गना करण्यातच रमले आहे!