मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्या टेकूवर उभे, ही लोकंच त्यांचे ‘बारा’ वाजवणार; संजय राऊत यांचा घणाघात

ना खाऊंगा, ना खाने दुंगा, असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने गेल्या 10 वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 विरोधी नेत्यांना सोबत घेऊन अभय दिले आहे. भाजपसोबत आलेल्या 23 नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दिलासा दिला आहे. ही काही नवीन बाब नसून याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही टिप्पणी केली आहे. इलेक्टोरल बॉण्डच्या घोटाळ्यामधूनही हे स्पष्ट झाले असून मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्या टेकूवर उभे आहे. यात महाराष्ट्रातीलही 12 लोकं असून ही लोकंच त्यांचे बारा वाजवणार आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जी 25 नावं समोर आली आहेत त्यात महाराष्ट्रातीलही 12 जण आहेत. हे लोकंच भाजपचे 12 वाजवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या लोकांविरुद्ध माहोल तयार केला होता. प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे किती भ्रष्टाचाराने माखलेले आहेत याबाबत मोदी आणि अमित शहा यांनीच देशभरात माहोल बनवला होता. पण आज हे सर्वच भाजपमध्ये आहेत. ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयटीची कारवाई सुरू होती त्यांना या दबावामुळे पक्ष सोडायला लागला आणि ते भाजपच्या मांडीवर बसले. मोदी सरकारच भ्रष्टाचाऱ्यांच्या टेकूवर उभे आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर, तर देशात गांधी कुटुंबावर, राहुल गांधी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, असेही राऊत म्हणाले.

हे वाचा – भाजपचे वॉशिंग मशीन… 10 वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 बड्या नेत्यांना अभय

संजय निरुपण यांच्यावरील कारवाईबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, कोणाला उमेदवारीसाठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मुंबईमध्ये शिवसेना किंवा महाविकास आघाडीपुढे कोणताही बंडखोर, गद्दार टिकणार नाही. मुंबईतील सर्वच्या सर्व 6 जागा महाविकास आघाडी जिंकतेय. त्याच्यामुळे कोणी उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचे आव्हान अजिबात वाटत नाही. तसेच मुंबई आणि पुण्यातील शिवसेनेची टीम सांगलीत ठाण मांडून बसणार असून सर्व मतदारसंघात जाणार आहे. तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

आधी स्वत:ची उमेदवारी जाहीर करा

विकासाच्या जोरावर निवडणूक लढण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कल्याण-डोंबिवलीतील विद्यमान खासदारांना उद्धव ठाकरे यांच्यामुळे खासदारकी मिळाली. पण युतीमध्ये ते स्वत:ची उमेदवारीही जाहीर करू शकले नाहीत. त्यामुळे जिंकण्याची भाषा करू नका. ‘दिल्ली बहो दूर है बच्चू’, असा टोला राऊत यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेची सामान्य कार्यकर्ती वैशाली दरेकर कल्याण-डोंबिवलीमध्ये गद्दारी, अहंकार, पैशाची मस्ती आणि गुंडगिरीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. कितीही बलदंड व्यक्ती असो, मस्ती चालणार नाही. सामान्य मतदार तुमचा पराभव करेल. आम्ही नारायण राणेंचा पराभव केला. इंदिरा गांधीही पराभूत झालेल्या. महाराष्ट्रात अनेक मोठेमोठे नेते पराभूत झाले आहेत. त्यामुळे हे जे बच्चू आहेत त्यांनी आधी स्वत:ची उमेदवारी जाहीर करावी.