डरपोक असल्यानेच मिंधे, अजित पवार भाजपसोबत गेले!

ईडी, सीबीआय, आयकर विभागाला घाबरून मिंधे आणि अजित पवार हे घाबरून भाजपसोबत गेले. त्यांच्या जाण्याची कारणे ही त्यांच्या डरपोकपणात आहेत आणि हे जगजाहीर आहे. वॉशिंग मशीनमधून स्वच्छ केले म्हणून त्यांची पापे धुऊन निघणार नाहीत, असा हल्ला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी पेला.

‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ‘तोंडी परीक्षा’ कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास आघाडी, सांगलीची जागा यासह अनेक प्रश्नांवर संजय राऊत यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.

ईडी, सीबीआयचा ताबा आठ दिवसांसाठी द्या

‘इंडिया’ आघाडीचे सरकार आले तर कोणते मंत्रीपद हवे, या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, इतकी वर्षे मी दिल्लीत आहे, पण मंत्रीपदाचा विचार कधीच केला नाही. पण मला नक्कीच आठ दिवसांसाठी ईडी आणि सीबीआय ही जी खाती आहे, त्यांचा पंट्रोल माझ्यासाठी असावा. फक्त आठ दिवसांसाठी एवढंच मला वाटतं. मला दाखवायचंय की, ही खाती कशी चालतात.