‘मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या पायाशी मराठीपण गुंडाळून ठेवलं असेल तर…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

धारावी वाचवण्यासाठी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खणखणीत आणि दणदणीत असा अतिविराट मोर्चा अदानीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयावर धडकला. मात्र या मोर्चाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चेष्टा करत असून याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या पायाशी मराठीपण गुंडाळून ठेवलं असेल, तसं त्यांनी सांगावं, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

काल धारावीमध्ये निघालेल्या मोर्चाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चेष्टा करत आहेत. तुम्ही कोणाची दलाली करताय? उद्योगपती आणि भांडवलदारांची. मोर्चाला बाहेरून माणसं आली होती असे म्हणतात. होय, पंतप्रधान मोदींनी जे यान चंद्रावर पाठवले, तिकडून इकडे ट्राफिक सुरू आहे. ती सगळी माणसं चंद्रावरून आली होती. पण प्रश्न मुंबईचा, धारावीचा होता ना? मग चंद्रावरून, मंगळावरून नाही तर बाहेरून माणसं येऊ द्या. मुख्यमंत्र्यांना काही कळतं का? असा सवाल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, मुंबई भांडवलदारांपासून वाचवण्यासाठी 106 जणांनी हौतात्म्य पत्करले. वेळ आली तर पुन्हा पत्करू. एका भांडवलदाराच्या घशामध्ये मुंबई जात आहे. त्याला काय हुंडा म्हणून मुंबई दिलीय का? ही मुंबई मराठी माणसाची आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चे मराठीपण दिल्लीच्या पायाशी गुंडाळून ठेवले असेल तर त्यांनी तसे सांगावं. काल निघालेला इशारा मोर्चा होता. धारावी वाचवा, मुंबई वाचवा आणि अदानीच्या घशातून मुंबई काढा ही अख्ख्या देशाची मागणी असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेनेने कधीही विकासाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. शिवसेनेच्या काळात मुंबईत औद्योगिक विकास झाला. आम्ही कधीही मुंबईत संप केला नाही, कारण विकासाची गती थांबते, असेही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

सरकार चर्चेपासून पळ का काढतंय?

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी संसद घुसखोरी प्रकरणावर राजकारण करू नका असे आवाहन केले आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, कोणीही टिकाटिप्पणी करत नाही. हा देशाच्या सुरेक्षाचा मुद्दा आहे. पण अज्ञात व्यक्ती देशाच्या संसदेत घुसतात, बॉम्बसदृश परिस्थिती निर्माण करतात, अराजकता माजवतात… मुळात सुरक्षा व्यवस्थेला तडा पाडून ते आत कसे घुसले याचा जाब सरकारला विचारण्याचा अधिकार संसदेच्या सदस्यांना आहे. गृहमंत्र्यांनी संसदेत यायला हवे आणि त्यावर चर्चा करायला हवी. सरकार चर्चेपासून पळ का काढत आहे? सत्य काय आहे, काय घडले हे सांगा, असे आवाहन राऊत यांनी दिले.

बेरोजगारी, महागाई हा मुद्दा

या घटनेमागचे मुख्य कारण बेरोजगारी आणि महागाई आहे, असेही खासदार राऊत म्हणाले. बेरोजगार मुलं वैफल्यग्रस्त होऊन संसदेत शिरली. ती दहशतवादी आहेत का? तर अजिबात नाही. त्यांना दहशतवादविरोधी कायद्याखाली अटक झाली आहे, पण या मुलांच्या भावना विद्रोहाच्या असून त्या देशाच्या भावना आहेत. सरकार 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होते, त्याचे काय झाले? ते दिले नाही आणि त्यातून तरुणांमध्ये हे वैफल्य आले. या देशात मुख्य मुद्दा बेरोजगारीचा आहे. रामलल्लाचे फुकट दर्शन घडवून बेरोजगारीचा मुद्दा संपणार नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.