अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार, प्रकृती बिघडल्याने एअरलिफ्ट करून दिल्लीला नेण्याची तयारी

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात मैहरमध्ये एका आदिवासी मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही अल्पवयीन मुलगी दुसऱ्या दिवशी जंगलात सापडली होती. अत्याचारामुळे या मुलीची प्रकृती गंभीर झाली असून तिला पहिले जिल्हा रुग्णालयातून रीवा येथील वैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयात आणण्यात आलं होतं. तिची प्रकृती फारच बिघडायला लागल्याने या मुलीला पुढील उपचारासाठी दिल्लीला नेण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी तिला एअरलिफ्ट करण्यात येण्याची शक्यता आहे.

या बलात्कार प्रकरणी मैहर शारदा देवी मंदिर समितीमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. 12 वर्षांची ही मुलगी गुरुवारी घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली होती. तिचा बराच शोध घेतल्यानंतर ती जवळच्या जंगलात सापडली होती. जेव्हा ही मुलगी सापडली तेव्हा तिची प्रकृती फार गंभीर होती. या बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी अतुल बरोडिया याच्या बायकोने आपला नवरा निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा आपला नवरा घरीच होता असं या महिलेने म्हटलं आहे. अतुल याचं घर प्रशासनाने बुलडोझरने पाडण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार ते पाडण्यात आलं आहे. दुसऱ्या आरोपीचं नाव रवी असून या दोघांनाही मंदीर समितीमधून बरखास्त करण्यात आलं आहे.