Sharad Mohol Murder – आर्थिक आणि जमिनीच्या वादातून खून, 3 महिन्यांपूर्वीच रचला होता कट

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा टोळक्याने शुक्रवारी भरदिवसा दुपारी दीड वाजता पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आर्थिक आणि जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. दुचाकीवर आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी मोहोळला सुतारदरा परिसरात गाठून पिस्तूलातून बेछूट गोळीबार केला होता. 3 गोळ्या लागल्याने गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर रा. सुतारदरा, कोथरूड याच्यासह साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे.

गॅगस्टर शरद मोहोळ याच्याविरूद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, सरकारी कामात अडथळा अशा गंभीरस्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत. संबंधित काही गुन्हात मागील काही महिन्यांपासून तो जामिनावर बाहेर होता. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात तो कुटूंबियासह राहायला होता. शुक्रवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास मोहोळ घराखाली उभा असताना, आरोपी साहिल उर्फ मुन्ना याच्यासह दुचाकीवर आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तूलातून बेछूट गोळीबार केला. हल्ल्यात तीन गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या काही साथीदारांनी मोहोळला उपचारासाठी सहयाद्री रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी 8जणांना अटक केली असून यामध्ये दोन वकिलांचाही समावेश आहे. शिरवळजवळ दोन गाड्यांमध्ये हे आरोपी पोलिसांना सापडले होते.

टोळक्याकडून आठवड्यापासून पाठलाग

कुख्यात शरद मोहोळ याचा गेम करण्यासाठी साहिल उर्फ मुन्ना याच्यासह 10 ते 12 जणांचे टोळके मागील आठवड्यापासून रेकी करीत होते. त्याच्यावर पाळत ठेवून माहिती काढत होते. तो सकाळी बाहेर पडण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत संपुर्ण माहिती टोळक्याने गोळा केली. मात्र, याची पुसटशी कल्पनाही मोहोळला आली नाही. शुक्रवारी (दि. 5 ) त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर पडण्यासाठी राहत्या इमारतीतून खाली आला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करून खून केला.

लग्नाच्या वाढदिवसाला गॅगस्टर शरदचा खून

लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे शरद हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदीरात दर्शनासाठी जाणार होता. त्यासाठी तो सव्वा एकच्या सुमारास राहत्या घरातून खाली आला. दर्शनासाठी जाण्यासाठी त्याचे साथीदार दुचाकी आणि इतर वाहने काढण्यात व्यस्त होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी मोहोळवर पिस्तूलातून बेछूट गोळीबार केला. त्यामुळे मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याच्या छातीत, कमरेत गोळ्या शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह सुरू झाला. साथीदारांनी शरदला रूग्णालयात दाखल केले खरे मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हल्लेखोरांनी प्लॅनिंग करून मोहोळचा खून केला असून त्यासाठी 3 पिस्तूलांचा वापर केल्याचे प्राथमिक तपास निष्पन्न झाले आहे. ही पिस्तुले मिळवण्याचे काम मुख्य आरोपी साहील पोळेकर यानेच केले होते. गोळीबारानंतर घटनास्थळी चार पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी त्याचा मृतदेह ससून रूग्णालयात आणण्यात आला होता. त्यावेळी मोहोळच्या साथीदारांसह नातेवाईकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. आरडओरड, रडण्याच्या हुंदक्यांनी परिसरात कल्लोळ माजला होता. यावेळी स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेच्या पथकांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

आर्थिक व जमिनीच्या वादातून खून झाल्याचा अंदाज

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचे विविध गुन्हेगारी टोळ्यांसोबत वादविवाद झाले होते. आरोपी साहिल उर्फ मुन्ना याच्यासोबत शरदचा आर्थिक व जमिनीचा वाद होता. त्याच वादातून मोहोळचा गोळ्या झाडून खून केल्याचे प्राथमिक अंदाज आहे. मागील काही महिन्यांपासून मोहोळ जामीनावर बाहेर असल्याने विरोधी गुन्हेगारी टोळ्यांत धुसफूस वाढली होती. कटशह, एकमेकांना आव्हान देण्यातून त्याचा खून केल्याचा अंदाज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

राजकीय पुनर्वसनाची होती चर्चा

जामिनावर बाहेर आल्यानंतर शरद मोहोळ याने मोठमोठया सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावण्यात सुरूवात केली होती. विविध सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी होउन त्याने स्थिर होण्यास प्राधान्य दिले होते. विशेषतः धार्मिक कार्यक्रमात त्याचा सहभाग वाढल्यामुळे अनेकांसोबत त्याचे संबंध सुधारले होते. त्याच माध्यमातून तो राजकीय पक्षात प्रवास करणार असल्याचे बोलले जात होते. आगामी विविध निवडणुकामध्ये शरद मोहोळ विविध राजकीय गटांना फायदेशीर ठरणार होता. व्होटबँकही मोठी असल्यामुळे त्याच्या राजकीय पुर्नवसनची चर्चा सुरु झाली होती.

कातिल सिद्धीकी हत्येनंतर देशभरात चर्चेत

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीरात बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत असलेला दहशतवादी कातिल सिद्धीकी याने जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस रंगीत तालीम केली होती. त्याने स्फोटकाची बॅग फुलवाल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, फुलवाल्याने बॅग ठेवून न घेतल्याने सिद्धीकीने बॅग घेऊन मुंबईच्या समुद्रात टाकून दिली.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने सिद्दीकीला अटक केली. संबंधित गुन्ह्यात त्याला पुण्यात आणून येरवडा कारागृहात ठेवले होते. 8 जून 2012 रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळने त्याचा कारागृहात खून केला होता. यानंतर मोहोळच्या खुनशी वृत्तीची देशभरात चर्चा झाली. तेव्हापासून तो मोठ्या प्रमाणात नावारूपाला आला.