मशाल या हुकुमशाहीला जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

नरेंद्र मोदी व अमित शहा यांना महाराष्ट्राचं सर्व ओरबाडून गुजरातला न्यायचं आहे. त्यामुळे यांच्या या हुकुमाशाहीला आता आपली मशाल जाळून खाक केल्याशिवाय राहाणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. राळेगाव येथील जनसंवाद सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे सरकारचा खरपूस समाचार घेतला.

उद्धव ठाकरे हे 12 मार्चपासून दोन दिवसांच्या वाशिम यवतमाळ दौऱ्यावर आले असून त्यांची पहिली सभा राळेगाव येथे पार पडली. या सभेला शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ” एक फुल दोन हाफ यांच्या सभेला सर्व गर्दी भाड्याने आणली जाते. पंचतारांकित हॉटेलमधून जेवण मागवलं जातं. एका सभेला कित्येक किलोची बिर्याणी मागवली होती. लोकं आली बिर्याणी खाल्ली. यांच्या भाषणाला कुणी आलंच नाही. आणि ते रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण देऊन गेलं. आपल्या सभेला कुणी भाड्याने आणलेलं नाही. ही अशी माणसं मला लाभली. त्यासाठी मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो.

2014 ला मोदीजी यवतमाळमध्ये येऊन गेले. आताही काही दिवसांपूर्वी ते इथे आले होते. 2014 ला दाभाडे गावात त्यांनी शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी काही वचनं दिली होती. 2014 ला तुम्ही जी आश्वासनं दिली होती. त्याचं काय झालं. ते म्हणालेले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, स्वामिनाथन समितीच्या आधारे हमीभाव देऊ, बँका घरी येऊन कर्जपुरवठा करतील, प्रामाणिकांना बक्षिस देऊन भ्रष्टाचारींना शिक्षा देऊ. मग मला मोदींना विचारायचं आहे की माझा शेतकरी प्रामाणिक नाही का. माझ्या शेतकऱ्यांना बक्षिस तर सोडा त्यांच्या शेतमालाला साधा हमीभाव दिला जात नाही. कर्जासाठी त्यांना घर, दागिणे, शेतजमिन सगळं काही गहान ठेवावं लागतं. हे का तुम्ही प्रामाणिकपणाला दिलेलं बक्षिस? असा संतप्त सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदींना केला.

यावेळी खासदार भावना गवळी यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ”मला अभिमान आहे की गेले कित्येक वर्ष हा मतदारसंघ आपल्या शिवसेनेसोबत राहिला आहे. आज काही जणांना वाटतंय की हा माझा मतदारसंघ आहे मी निवडून येणार. पण नाही तुम्ही आता खोक्यात बंद झाला आहात. गद्दार झाला आहाक. तुम्ही शिवसेनेशी, जनतेशी गद्दारी केली. या खासदार गद्दारी करून तिथे गेल्या आहेत. गद्दारी करायच्या आधी त्यांच्यावर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत होती. नंतर त्यांनाच सोबत घेतलं. हेच का तुमचं आश्वासन. प्रामाणिकाला आत्महत्येचं बक्षिस आणि भ्रष्टाचाऱ्याकडून राखी बांधून घेताय. हा तुमच्या बक्षिस आणि शिक्षेतला फरक आहे का?, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”विजपुरवठा करू, पक्की घरं देऊ, कर्ज माफ करू, शेतीसाठी पाणी देऊ. करतोय ते आम्हीच करतोय असं दाखवायचं. किती नालायकपणा यांचा. तुमच्या समस्या मोदींना सोडवायच्याच नाहीत. 2014 साली एका पक्षाची पालखी वाहिली. मुर्ख होतो म्हणून तुम्हाला पाठिंबा दिला. यांना यावेळेस चारशेच्या वर जागा हव्या आहेत. या जागा त्यांना देशाचा विकास करण्यासाठी नकोयत. जर विकास करायचा असता तर या भागात गेल्या दहा वर्षात एक तरी उद्योग आणला असता. बेगळा प्रकल्प पूर्ण करायला काहीतरी पैसे दिले असते. यांना सभेच्या वेळी भेटायला आलेल्या दाभाडेच्या शेतकऱ्यांना भेट नाकारली. त्यांना सभेला देखील येऊ दिलं नव्हतं. यांना घटना बदलायला 400 च्या वर जागा हव्या आहेत. यांचे एक खासदार अनंतकुमार हेगडेंनी सांगितलं की चारशेच्या वर जागा मिळाल्या तर आम्ही घटना देखील बदलणार आहोत. सुरुवातीला असं दाखवतील की घटना तुमच्या हितसाठी बदलली. मात्र त्यानंतर देशात निवडणूकाच हे होऊ देणार नाहीत. जसं रशियात व्लादमिर पुतीन लोकशाही पद्धतीने जिंकत जिंकत गेले व पाशवी बहुमत मिळवलं. तसंच इथेही सुरू आहे. तिथले न्यायमूर्ती देखील आता पुतीन नेमतात. तसंच यांनाही करायचं आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

… तर मोदींना सभा घ्यावी लागली नसती

”मला जेव्हा मुख्यमंत्री व्हावं लागलं होतं. तेव्हा मी प्रामाणिकपणे दोन लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. अजून एक योजना मी आणणार होतो. अभ्यास करून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव कसा मिळेल यासाठी योजना आणणार होतो मात्र या गद्दारांनी सरकार पाडलं. मला शेतीतलं काय कळतं असं माझ्याविषयी बोललं गेलं. मला शेतीतलं काही कळत नाही. कळूनही घ्यायचं नाही. मला फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसतात व ते पुसायचे आहेत. सर्वाधिक आत्महत्या या जिल्ह्यात, होतात. ही काही गौरवाची बाब आहे का? आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे हा. या जिल्ह्यातील एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत मिळवायला किती खेट्या घालाव्या लागतात. अवघ्या एक लाख रुपयांसाठी किती त्रास देता. नुकतेच मोदीजी यवमाळला आले होते. त्यावेळी मोदीजींच्या सभेला 12 कोटी खर्च झाले. ते 12 कोटी सभेवर खर्च न करता त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिले असते तर असंच तुम्हाला मतं मिळाली असती. सभा घ्यायची गरजच लागली नसती , असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

परिवाराची जबाबदारी देखील घ्या

”निवडणूक आल्यावर पंतप्रधान बोलतात हा माझा परिवार आहे. ही 140 कोटी जनता माझा मोदी परिवार आहे. कोरोना काळात मी देखील म्हणालो होतो की तुम्ही सर्व माझे कुटुंब आहात. पण मी फक्त कुटुंब आहात नव्हतो म्हणालो. मी माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हटलं होतं. आणि म्हटल्याप्रमाणे मी माझ्या जनतेची जबाबदारी देखील घेतली. मोदीजी फक्त परिवार बोलू नका. परिवाराची जबाबादारी घ्या. यांना जबाबदारी घ्यायची नाही. फक्त माझा परिवार आहे म्हणायचं. तुम्ही त्यांना दया दाय़वाल पण ते तुम्हाला दया नाही दाखवत. एवढाच जर तुम्हाला वाटत असेल तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आमच्या मुलाबाळांवर बोलाल तर धिंडवडे काढू

‘अमित शहा घराणेशाहीवर बोलतायत. मला नरेंद्र मोदी व अमित शहा यांना विचारायचं आहे तुम्ही तुमचं घराणं सांगा. मला तर माझं घराणं सांगायचीच गरज नाही. गेली कित्येक वर्ष आमचं घराणं लोकांच्या सेवेसाठी झटत आहे. आम्ही पनवेलमध्ये राहत होतो तेव्हा राज्यात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी शव वाहून न्यायला कुणी तयार नव्हतं. त्यावेळी माझ्या आजोबांच्या वडिलांनी ते काम केलं होतं. त्यामुळे त्यांनाही प्लेग झाला व ते देखील मृत्युमुखी पडले. हा आमच्या घराण्याचा इतिहास आहे. तुम्ही आमच्या मुलाबाळांवर बोलणार तर आम्ही तुमचे धिंडवडे नाही का काढणार. जय शहाचं कर्तृत्व काय आहे. जसं मोदी आणि शहा उद्योग गुजरातला नेतायत. जय शहाने क्रिकेटची फायनल गुजरातला नेली. त्याचा आर्थिक फायदा महाराष्ट्राला झाला असता तो फायदा गुजरातला झाला. महाराष्ट्राला ओरबाडून सर्व गुजरातला नेले जातेय. हीच का मोदींची गॅऱंटी. याच मोदी गॅरंटीचा चुराडा करून टाकण्यासाठी मविआ आणि मशाल याचाच आता विचार करायचा. महाराष्ट्र तुम्हाला काय लुटारुंची पालखी वाहणारा वाटला का? मी या लुटारुंच्या हुकुमशहांच्या विरोधात उतरलो आहे. आपली मशाल या हुकुमशाहीला जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपने देशाला लुटले

‘मोदी म्हणतात 75 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं. आपण हिशोब काढूया. आता जो काही आकडा निवडणूक आयोगाकडून आलेला आहे त्यात भाजपकडे 8000 कोटींची ठेव आहे आणि काँग्रेसकडे 800 कोटी आहेत. जे काँग्रेसला जमलं नाही ते यांनी करून दाखवलं. दहा वर्षात 8000 कोटी कमवले. तरी काँग्रेसवर आरोप करतात की यांनी देशाला लुटलं. खरंतर कुणी देशाला लुटलं ते दिसत आहे. काँग्रेसने लुटलं की भाजपने लुटलं. देशातली जनता काय मुर्ख नाही.