रक्ताचा थेंबही न सांडता राममंदिर उभं राहतंय म्हणणं कारसेवकांचा अपमान, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा

रक्ताचा थेंबही न सांडता राममंदिर उभे राहतेय असे म्हणणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. हा दोन कारसेवांमध्ये बलिदान दिलेल्या, रक्त सांडलेल्या, मृत्युला कवटाळलेल्या हजारो कारसेवकांचा अपमान आहे. गृहमंत्र्यांकडे इतकी अपूर्ण माहिती असावी हे दुर्दैव आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांच्या विधानावर परखड शब्दांमध्ये भाष्य केले. गृहमंत्री म्हणताहेत रक्ताचा एक थेंबही न सांडता आम्ही राममंदिर बांधले, पंतप्रधानांच्या काळात रक्तपात न होता आम्ही सर्व प्रश्न सोडवले. गृहमंत्र्यांकडे इतकी अपूर्ण माहिती असावी हे दुर्दैव आहे कश्मीरमध्ये आजही हत्या होत आहेत, कश्मिरी पंडितांची घरवापसी झालेली नाही. सैनिकांना आजही बलिदान द्यावे लागतेय. ते रक्त नाही तर काय झेलमचे पाणी आहे का? मणिपूरमध्येही रक्तपात सुरू आहे, गृहमंत्री ते रोखू शकलेले नाहीत, असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राहिला प्रश्न अयोध्याचा, तर रक्ताचा थेंब न सांडता आम्ही राममंदिर बांधत आहोत असे बोलणे हा दोन कारसेवांमध्ये बलिदान दिलेल्या, रक्त सांडलेल्या, मृत्युला कवटाळलेल्या हजारो कारसेवकांचा अपमान आहे. राम मंदिरासाठी शेकडो कारसेवकांनी बलिदान दिले, तुरुंगात गेले, गोळ्या झेलल्या. शरयू नदी कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली होती, हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले आहे. तुम्ही नसाल त्या लढाईत कदाचित, पण त्यात शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद असे प्रमुख हिंदुत्ववादी लोकं आणि राजकारणाशी संबंध नसलेले हजारो लोकं होते.

गोध्रा कांडचा संबंध अयोध्येशी जोडला जातो. मग ते बलिदान नाही का? साबरमती एक्सप्रेसमध्ये जे कांड झाले ते अयोध्येशी संबंधितच होते, सत्तेवर आल्यावर हे देखील विसरलात का? अमित शहांचे विधान शेकडो, हजारो कारसेवकांचा अपमान करणारे आहे. राम मंदिराचे श्रेय तुम्ही मोदींना देता, पण आज जे मंदिर उभे राहत आहे त्याचे श्रेय कारसेवकांसोबत सर्वोच्च न्यायालयाला द्यायला हवे, असेही राऊत म्हणाले.

आयुष्यमान भारत आणि भारतमाला प्रकल्पातील गैरव्यवहार दाखवून देणाऱ्या कॅगच्या अधिकाऱ्यांच्या मोदी सरकारने बदल्या केल्या आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ ही नारेबाजी सुरुच आहे. काही लोकं खात आहेत, काही लोकांचे ढेकर देऊनही पोट भरत नाही. राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे दोन लोकं विकताहेत, दोन लोक खरेदी करताहेत हीच देशाची स्थिती आहे. घोटाळे समोर येत आहेत. 2024पर्यंत घोटाळ्यांचा समुद्र वर येईल, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

दरम्यान, मेट्रोचे कारशेड कांजुरमार्ग येथेच होणार असून त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र केवळ राजकारण करण्यासाठी आरे, आरे करणारे आज कांजुरमार्ग येथेच कारशेड उभारत आहेत. उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होते. मात्र विरोधासाठी विरोध करणाऱ्यांमुळे किती काळ वाया गेला? किती खर्च वाढला? इतक्या वेळात मेट्रो सुरू झाली असती. फडणवीस यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. कायदेशीर अडचणी निर्माण केल्या. हा मुंबईच्या जनतेच्या विकासाचा प्रश्न आहे असे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांना समजावले. पण त्यांनी आरेतील शेकडो झाडे तोडून पर्यावरणाचा नाश केला, लोकांवर खटले दाखल केले आणि शेवटी परत फिरून तिथेच आले. हे यांचे राजकारण, धोरण आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.