महात्मा फुले रुग्णालयाच्या जागी विक्रोळीत तीन वर्षांत होणार सुपरस्पेशालिटी रुग्णालय

विक्रोळी, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड, घाटकोपर परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रयत्नांमुळे लवकरच सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगरात असणाऱया क्रांतिवीर महात्मा फुले रुग्णालयाच्या जागी येत्या तीन वर्षांत 500 खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधले जाईल, असे आश्वासन आज राज्य शासनाने विधानसभेत दिले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील राऊत यांनी यासंदर्भात आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करून त्याजागी 500 खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे केले जाईल, असे आश्वासन 15 सप्टेंबर 2022 रोजी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र या रुग्णालयासाठी म्हाडा प्राधिकरणाकडून ‘ना-हरकत’ (एनओसी) प्रमाणपत्र दिले जात नसल्याने या रुग्णालयाचा पुनर्विकास रखडला असल्याचे आमदार सुनील राऊत यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

घाटकोपर ते मुलुंड परिसरातील लाखो नागरिकांसाठी महानगरपालिकेचे एकमेव रुग्णालय आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील विक्रोळी, कन्नमवार नगर, टागोर नगर, घाटकोपर, कांजूर, भांडुप, मुलुंड, सूर्यनगर या परिसरातील नागरिकांना उपचारासाठी या एकाच रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना उपचार मिळण्यात गैरसोय होते, असेही आमदार राऊत यांनी सांगितले. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम किती दिवसांत सुरू करणार आणि किती दिवसांत रुग्णालय उभे राहणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. विक्रोळीतच महापालिकेच्या जागेवर असलेले शुश्रूषा रुग्णालय बंद पडले असून तिथे महात्मा फुले रुग्णालयाला तात्पुरत्या स्वरूपात जागा दिली जावी, असेही त्यांनी सुचवले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नांना उत्तर दिले.