साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र माहूर येथे नवरात्र महोत्सवास प्रारंभ

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण व मूळपीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता गडावर रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी परंपरेनुसार नवरात्रोत्सवास उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला ‘ऊदे ग अंबे उदे’ च्या गजरात पहिल्या माळीला सकाळी 7 वाजतापासून सनई वादक नितीन धुमाळ व संच (नाशिक) यांच्या सनईच्या सूरात प्रसिद्ध घोषात अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महा पूजेने सुरुवात झाली. गणेश पुजन, कलश (वरुन) पूजन, पुण्याहवाचन, मातृकापुजन करण्यात आले. पुजारी भवानीदास भोपी, शुभंम भोपी, विनायक फांदाडे, बालाजी जगत यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक करण्यात आला. सिंगार, अलंकार करून पिवळा रंगाचे पैठणी महावस्त्र परीधान करण्यात आले. श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभार्‍यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदीर, श्री परशुराम मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात संप्त धान्य टाकुन, कुंडावर मातीची कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, साभोताल पाच उसाचे धांडे उभारुन आणि त्या आधारे कलशावर (पुष्पहार) पहिली माळ चढवून सकाळी 12.15 मी. संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड नागेश न्हावकर, सहा.जिल्हाधिकारी तथा सचिव किर्ती के.एन. (भाप्रसे), उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपाध्यक्ष दादासाहेब सिनगारे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. व दुपारी 12.30 वाजता श्री मातेस महानैवेद्य ठेवून महाआरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त चंद्रकात भोपी, संजय काण्णव, दुर्गादास भोपी, आशिष जोशी, अरविंद देव उपस्थित होते. नंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती पूजन करण्यात आले.

नागेश न्हावकर, किर्ती के.एन. सपत्नीक यांच्या हस्ते कुमारीका पूजन, आरती करण्यात आली. अखंड नंदादिप पूजन, सुवर्ण अलंकार पूजन करण्यात आले. श्री दुर्गासप्तशती शतचंडी पाठाची सुरुवात, संकल्प, चतुर्वेद वेद पारायण सुरुवात करण्यात आली. पायस नैवेद्य, गायीचे तुप, छबीना परिवार देवता पूजन झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद सुरु करण्यात आला. नंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती पूजन करण्यात आले.

प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मंदिरात अखंड देवी समोर नंदादिप तेवत ठेवून दररोज पायास म्हणजे दहीभात, पुरणपोळीचा नवैद्य, आरतीनंतर छबिना कढला जावून, रेणुका ज्या गडावर प्रकटली त्या गडाला प्रदक्षीना घालुन छबिना परत रेणुका मंदिरात येत असतो.

यावर्षी गाभार्‍यात मागील भागात व पुढून नक्शी काम केलेला चांदीचा पत्रा (प्रभावळ) लावण्यात आले आहे. खामगाव येथील चांदीत बंगालच्या कारागिर व राजस्थान येथील कारागिर यांनी सागवाणी लाकुड काम केले आहे, मागील तीन दिवसांपासून नवरात्र महोत्सव निमित्त हे कारागिर काम करत होते. यामुळे भाविकांना यावर्षी रेणुका मातेचे नविन रूप पाहावयास मिळत आहे.

गडावर जाणार्‍या रस्त्यावरील टि. पॉइंट व मेन रोडवर पोलीसांनी बॅरीकेट लावून खाजगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी केली आहे. एसटी महामडळाकडून 100 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपंचायतकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्, तेलंगणा राज्यातील भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरने, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाराव सिनगारे, पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर, सपोनी. संजय पवार, स्थागुशाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.एस. सोनवने, पोहेका,गुडेराव करले, एस.जिकल्लवाड, देवा चव्हाण हे आपल्या कर्मचार्‍यांसह चोख बंदोबस्त ठेवत आहेत.