कॅनडातील साइनबोर्डवर पंतप्रधान मोदींच्या विरोधात संदेश; दहशतवादी म्हणून संबोधलं

कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरातील श्री भगवद्गीता पार्कमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात संदेश लिहिण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. साइनबोर्डवर स्प्रे पेंटिंग करून पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा करण्यात आला आहे.

या घटनेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर स्थानिक शहर प्रशासनाने पार्कमधील या घटनेचा त्याचा निषेध केला. हा समाजावरचा हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘पार्क मध्ये करण्यात आलेली तोडफोड आणि साइनबोर्डवरील पंतप्रधान मोदींविरोधातील संदेशाच्या घटनांचा निषेध करण्यात येत आहे, हा एकप्रकारे समाजावरील हल्ला आहे. या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू करण्यात आला असून योग्य कारवाईसाठी हे प्रकरण पोलिसांकडे पाठवण्यात आलं आहे’.

पुढे म्हटलं आहे की, ‘सिटी ऑफ ब्रॅम्प्टन येथे, आम्ही अशा असहिष्णुता आणि भेदभावाच्या कृतींविरुद्ध एकजुटीने उभे आहोत. आम्ही आमची विविधता, सर्वसमावेशकता आणि सर्वांचा आदर अशा मूल्यांचं अभिमानानं समर्थन करतो आणि द्वेषा पसरवणारी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत’.

रिपोर्टनुसार, हा साइनबोर्ड शुक्रवारी सकाळी प्रथम दिसला आणि थोड्या वेळाने तो स्वच्छ करून पूर्ववत करण्यात आला.

ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी कॅनेडियन मीडियाला सांगितलं की, या कृत्यामुळे ‘संताप’ व्यक्त होत आहे आणि शहर प्रशासन अशा घटना खपवून घेणार नाही.

अशा घटनेची ही काही पहिली वेळ नाही.

जानेवारीमध्ये, कॅनडाच्या ब्रॅम्प्टनमधील एका प्रख्यात हिंदू मंदिराची तोडफोड झाल्यानंतर टोरंटोमधील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासानं कॅनडाच्या अधिकार्‍यांकडे नाराजी व्यक्त केली होती. या कृत्यामुळे हिंदुस्थानी समाजात नाराजी पसरली आहे.

महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी या घटनेची दखल घेत या कृत्याचा निषेध केला.