2024 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची शक्यता धूसर! कायदे आयोगाच्या सूत्रांची माहिती

2024 मध्ये एकाचवेळी निवडणुका होणार नाहीत, असं कायदा आयोगाच्या सूत्रांनी शुक्रवारी सांगितलं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही प्रणाली लागू करणं शक्य होणार नाही, असं कायदे समितीचं मत आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत कायदे आयोगाचा अहवाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित होणं अपेक्षित आहे. यासंदर्भात इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे. कायदा आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांनी बुधवारी इंडिया टुडेला सांगितलं की, ‘अजूनही एकाचवेळी निवडणुका घेण्यावर काही काम सुरू असल्यानं अहवालाला थोडा वेळ लागेल’.

या अहवालात देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी घटनादुरुस्ती सुचवली जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. यापुढे, ते विशेषत: लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करतील.

डिसेंबर 2022 मध्ये, 22 व्या विधी आयोगानं देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर राष्ट्रीय राजकीय पक्ष, निवडणूक आयोग, नोकरशहा, शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ञांसह संबंधितांचं मत जाणून घेण्यासाठी सहा प्रश्नांचा एक संच तयार केला. आयोगाचा अहवाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे आणि तो केंद्रीय कायदा मंत्रालयाला सादर केला जाईल.