सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, काँग्रेसकडून राजस्थानमधून राज्यसभेची उमेदवारी

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी काँग्रेसने त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात सोनिया गांधी यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

सोनिया गांधी यांनी बुधवारी जयपूर येथे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राहुल गांधी व प्रियांका गांधी त्यांच्यासोबत होते. तब्बल पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच सोनिया गांधी या लोकसभा निवडणूक लढवत नाहीएत.

प्रियांका गांधी रायबरेलीतून लढवणार
सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूकीतून माघार घेतल्याने आता रायबरेली मतदारसंघाची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रियांका गांधी यांना उतरवले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.