नगर शहरात महाविकास आघाडीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद; निलेश लंके यांनाच आमचे मत, नागरिकांच्या भावना

नगरमध्ये सेवा, विकास हे मुद्दे घेऊन अनिलभैय्या राठोड यांनी सलग 25 वर्षे या शहराचे नेतृत्व केले. त्यांनी शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेले नगर शहर सक्षमपणे सांभाळले. त्यामुळे नागरिक निर्भय आणि समाधानी होते. राठोड यांच्या पश्चात त्यांचे शिलेदार असलेले निलेश लंके हे नगर दक्षिण मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. आम्ही अनिल राठोड यांचा विचार मानणारे सर्वसामान्य नागरिक असून निलेश लंके यांनाच पसंती देणार असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ नगर शहरातील सुभाष चौक येथे विजयाची गुढी उभारुन करण्यात आला. शिवालय येथे विजयी गुढी उभारल्यानंतर नवीपेठ, अर्बन बँक रोड, कापड बाजार, मोची गल्ली, सराफ बाजार, दाळ मंडई, आडते बाजार आदि परिसरातून प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत स्व. अनिलभैय्या यांच्या मावळ्यालाच आमचे मत देणार अशा भावना व्यक्त केल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून देत उत्तेरेचे पार्सल आपल्याला परत पाठवाचे आहे. नगर शहरात स्व.अनिल राठोड यांनी 25 वर्षे आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा केली. लोकसभा निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणून नगर दक्षिण लोकसभेवर महाविकास आघाडीची विजयाची गुढी उभारायचीच व उत्तरतेतील प्रस्थापितांचे पार्सल आपल्या येथून हुसकावून लावायचे, असा निर्धार करत कामाला लागा, असे आवाहन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार नेत्रदिपक कामगिरी करुन मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी होणार आहेत. निलेश लंके यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेस, आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरले आहेत. नगर दक्षिणेतून निलेश लंके हे सर्वसामान्यांचे नेतृत्व असून त्यांना मोठे मताधिक्क्य मिळेल असा विश्वास कळमकर यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे किरण काळे म्हणाले की, नगर दक्षिणच्या विद्यमान खासदाराने गेल्या पाच वर्षात मतदार मतदार संघासाठी काहीही केले नाही. ते निवडून दक्षिणतून येतात आणि विकास उत्तरेत करतात. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना भरघोस मतांनी निवडून देऊन निष्क्रय खासदाराला पुन्हा उत्तरेत पाठवावे, असे आवाहन केले.