रवी शास्त्री यांनी अश्विनच्या हेअरकटवर दिली प्रतिक्रिया, इंग्लंडला दिला इशारा

हिंदुस्थानी संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मंगळवारी बीसीसीआयने ‘लाइफटाइम अचीव्हमेण्ट’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. बीसीसीआयच्या या कार्यक्रमादरम्यान मंगळवारी रवी शास्त्री यांनी इंग्लंडला आगामी टेस्ट सिरीजमध्ये अश्विनपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. याबरोबरच रवि शास्त्री यांनी अश्निनच्या नवीन हेअरकटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले आगामी टेस्ट सिरीजमध्ये अश्विन इंग्लंडसाठी मोठे आव्हान असेल.

हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंडची पहिली टेस्ट मॅच उद्या 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. कार्यक्रमात रवी शास्त्री म्हणाले, अश्विनने आता सांगितले आहे की, मी चांगली खेळी खेळणार आहे. आता त्याने छानसा हेअरटकट केला असल्याने त्याचं डोकंही मोकळं आहे. ताजी हवा त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचणार आहे. आता तुम्ही विचार करु शकता का त्याच्या डोक्यात काय चालले आहे? तिसरा असू शकतो किंवा चौथाही? इंग्लंडला काही महिन्यात कळेल.

बीसीसीआयने एका समारंभात 2019-20सालातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. हिंदुस्थानचे माजी विकेटकीपर फारुख इंजिनीअर यांनाही ‘लाइफटाइम अचीव्हमेण्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविचंद्रन अश्विनने 2020-21 सीजनसाठी पॉली उमरीगर पुरस्कार जिंकला.

60 वर्षीय रवी शास्त्री यांनी 80 टेस्ट आणि 150 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर त्यांनी कमेंटेटर म्हणून आपला ठसा उमटवला. शास्त्री हे दोन वेळा राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होते. 2014 ते 2016 पर्यंत संघ संचालक म्हणून ते राष्ट्रीय संघात सामील झाले आणि त्यानंतर 2017 ते 2021 मधील टी20 विश्वचषकापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका जिंकल्या. मात्र, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आली नाही.