एखादा बळी देऊनच ठेकेदार पादचारी उड्डाणपुलाचे काम सुरू करणार का? प्रतिज्ञा उत्तुरे यांचा संतप्त सवाल

गेल्या 25 वर्षांपासून रेल्वे रूळ ओलांडून शहरातील एस.टी. स्टॅण्ड ते राजारामपुरी या मार्गावर धोकादायकरीत्या पायी ये-जा करणाऱया नागरिकांचा विचार करून अखेर पादचारी उड्डाणपुलासाठी 4 कोटींचा निधी मंजूर झाला. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजनही झाले. याला महिना उलटला तरीही अद्यापि कामाला सुरुवात झाली नाही. वाहनांच्या गर्दीत जीव धोक्यात घालून नागरिक ये-जा करत आहेत. त्यामुळे एखादा बळी देऊनच ठेकेदार कंपनी उड्डाणपुलाचे काम सुरू करणार आहे का? यासाठी महापालिका प्रशासनाने झोपेचे सोंग का घेतले आहे? असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर शहर संघटिका व माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केला आहे.

कोल्हापुरात रेल्वे रुळ ओलांडून जाणाऱया नागरिकांना रोखण्यासाठी रेल्वे विभागाने मोठी भिंत उभारली आहे. एस. टी. स्टॅण्ड ते राजारामपुरी या मार्गावर पायी ये-जा करणाऱयांची यामुळे मोठी कुचंबना झाली आहे. त्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी नागरिक आणि विद्यार्थी असे दररोज सुमारे 20 ते 25 हजार नागरिक परिख पुलाखालून ये-जा करत आहेत. या पुलाखालून वाहणाऱया वाहनांच्या गर्दीतून वाट काढत नागरिक जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत. महानगरपालिकेने 2013 मध्ये पादचारी उड्डाणपुलासाठी सुमारे दीड कोटींचा प्रस्ताव केला होता. पण उंचीचे कारण दाखवून रेल्वे खात्याने प्रस्ताव नामंजूर केला. आता त्याची किंमत सुमारे 4 कोटी झाली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने ठेकेदाराकडून तत्काळ काम सुरू करून पूर्ण करून घ्यावे. कोल्हापूर शहराचा उत्तर-दक्षिण भाग जोडण्यासाठी हा पादचारी उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे, असेही प्रतिज्ञा उत्तुरे यांनी म्हटले आहे.

उड्डाणपुलाला रेल्वे प्रशासनाचीही मंजुरी

जिल्हा नियोजन समितीमधून एस.टी. स्टॅण्डकरून राजारामपुरीकडे ये-जा करण्यासाठी लोखंडी उड्डाणपूल बांधण्यासाठी 3 कोटी 88 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. रेल्वे विभागानेही त्याला मंजुरी दिली आहे. 54 फूट लांबीचा आणि सुमारे साडेतीन फूट रुंदीचा हा पादचारी उड्डाणपूल आहे. त्याची उंची सुमारे पावणेसहा मीटर इतकी आहे. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला सहा महिन्यांची मुदत आहे. त्यातील एक महिना असाच बिनकामाचा गेला. आता दोन महिन्यांनंतर पाऊस सुरू होईल. मग पादचारी उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार कधी, असा सवाल प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केला आहे.