शेअर बाजारात ‘हिरवळ’, सेन्सेक्स-निफ्टीचा नवीन उच्चांक; कोणते शेअर तेजीत? वाचा सविस्तर…

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये तेजी पहायला मिळाली. सोमवारी बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये वाढ नोंदवण्यात आली. खरेदीचा सपाटा सुरू झाल्याने बाजार शिखरावर पोहोचला.

सोमवारी सकाळी सेन्सेक्स 441.65 अंकांच्या वाढीसह 74,254.62 वर ओपन झाला. सेन्सेक्सचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. अर्थात हा उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेकमध्ये थोडी घसरण पहायला मिळाली. दुसरीकडे निफ्टीही सुरुवातीच्या सत्रामध्ये 152.50 अंक उसळून 22,479.40 वर ओपन झाला. त्यानंतर आणखी तेजी नोंदवण्यात आल्याने निफ्टी 22,529.95 पर्यंत पोहोचला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आल्याने शेअरच्या किंमतीही चांगल्याच वाढल्या. सर्वाधिक वाढ होणारे टॉप-5 शेअर पाहूया..

1. Vodafone IDea Share – या शेअरमध्ये 6.65 टक्क्यांची तेजी दिसून आली. 13.35 रुपयांना ओपन झालेला हा शेअर 14.25 रुपयांपर्यंत पोहोचला होता.

2. JSW Steel Share – 1.12 कोटी रुपयांचे भागभांडवल असणाऱ्या या कंपनीचा शेअर 838 रुपयांवर ओपन झाला. 5 टक्क्यांच्या तेजीसह हा शेअर 876.45 रुपयांपर्यंत पोहोचला होता.

3. Torent Power Share – या शेअरमध्येही 5.50 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. 1399 रुपयांवर ओपन झालेला हा शेअर 1463 रुपयांपर्यंत पोहोचला होता.

4. NMDC Share – 62 हजार कोटींचे भागभांडवल असणाऱ्या या शेअरमध्येही जवळपास 5 टक्के वाढ झाली आणि या शेअरची किंमत 211.90 रुपयांवर पोहोचली होती.

5. IREDA Share – रेल्वेच्या या शेअरमध्ये सोमवारी अपर सर्कीट लागले. 138 रुपयांवर ओपन झालेला हा शेअर 4.97 टक्क्यांच्या तेजीसह 142.65 रुपयांवर पोहोचला होता.

दरम्यान, यासह IOB, UCO Bank, Tata Steel, IRCTC आणि YES Bank शेअरमध्येही चांगली तेजी दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला.