आमदार रोहित पवार-युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका, तातडीने सुरक्षा पुरवा!

आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका असून त्यांना तातडीने सुरक्षा पुरवा असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना लिहिले आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी हे पत्र लिहिल्याने दोघांना नक्की कोणाकडून धोका आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार कुटुंबातही फूट पडली आहे. एका बाजूला अजित पवार, तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटुंब आहे. रोहित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची साथ दिली आहे. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यात बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना होणार अशी चिन्हे आहेत. नेतेच नाही तर दोन्ही बाजुचे कार्यकर्तेही आक्रमक होत आहेत. काही दिवसांपूर्वी युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेरावही घातला होता. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी पत्र लिहून पोलीस अधिक्षकांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे, असे सुप्रिया सुळे पत्रात म्हणाल्या.

पत्रात त्या पुढे म्हणतात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे. सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही.

यामुळे आपणाकडून आणदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी, ही विनंती आहे. आपण याबाबत विनाविलंब कार्यवाही कराल, असा विश्वास वाटतो, असे सुप्रिया सुळे यांनी पोलीस अधिक्षकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.