नगर जिल्ह्यात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नगर जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करत त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी हे निर्देश दिले आहेत. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांच्या शोध घेण्यासाठी मोहिम राबविण्यात यावी. ज्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असणारी नोंदणी नाही. व्यवसायासाठी कुठलीही अर्हता नसलेल्या व जनतेची फसवणूक करणाऱ्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी. यापूर्वीच्या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या व न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांचाही सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी विषयाची विस्तृत माहिती सभागृहाला दिली.