तामीळनाडूत गोल बुबुळाच्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध; ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश

तामीळनाडूत पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरून गोल बुबुळे असलेल्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामध्ये तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि ईशान अगरवाल यांचा सहभाग आहे. नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आला आहे.

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या भारतीय द्विपकल्पामधील पालींच्या सर्व्हेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळल्या आहेत. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्टय़ आहे. रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील टय़ुबरकलची रचना, जनुकीय संचाच्या वेगळेपणावरून दोन्ही पाली कुळातील इतरांपासून व एकमेकांपासून वेगळय़ा ठरतात.

असे केले नामकरण

‘निमास्पिस व्हॅनगॉगी’ ही प्रजात तामीळनाडूतील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळली. निमास्पिस व्हॅनगॉगी या प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरून केले आहे. या पालीच्या अंगावरील रंगसंगती वॅन गॉग यांच्या ‘द स्टारी नाईट’ चित्राशी मिळतीजुळती आहे.

‘निमास्पिस सथुरागिरीएन्सिस’ ही प्रजात तामीळनाडूच्या विरुदुनगर जिह्यातील साथुरागिरी पर्वतावर आढळून आली. तिच्या आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण ‘निमास्पिस सथुरागिरीएन्सिस’ असे केले आहे. नव्याने शोध लागलेल्या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.