अमेरिकेत टिकटॉकवर बंदी

चिनी सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर बंदी घालणारे विधेयक अमेरिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आले. टिकटॉक अमेरिकेतील छोटय़ा मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. 2020 मध्ये टिकटॉक अॅपवर बंदी घालणारा हिंदुस्थान पहिला देश ठरला होता. टिकटॉकवर यूजर्सचा खासगी डेटा चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. हिंदुस्थान नंतर आता चार वर्षांनी अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. अमेरिका काँग्रेसच्या खालच्या सभागृहात विधेयकाच्या बाजूने 352 मते पडली, तर विरोधात केवळ 65 मते पडली. विधेयकाच्या बाजूने दोन्ही प्रमुख पक्षांनी रिपब्लिकन पार्टी आणि डेमोव्रॅटिक्सच्या खासदारांनी सहमती दर्शवली. विधेयक मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज होती. आता हे विधेयक मंजुरीसाठी सिनेटकडे पाठवले जाईल. जर हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर झाल्यास ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. अमेरिकेत जवळपास 17 कोटी यूजर्स टिकटॉकचा वापर करतात. हिंदुस्थानातही टिकटॉकचे कोटय़वधी यूजर्स होते. परंतु या अॅपवर बंदी घालण्यात आल्यानंतर यूजर्संना आता टिकटॉकचा विसर पडला आहे. टिकटॉकची जागा आता इन्स्टाग्रामच्या रीलने घेतली आहे.