मुख्याध्यापकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांसह पालक संतप्त, बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या

( राहाता ) तालुक्यातील कोर्हाळे गावात मुख्याध्यापकांची अचानक बदली करण्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले होते. मुख्याध्यापक सुरेश लावरे यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी शाळेतील आठशे ते नऊशे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांनी शाळेचे कामकाज बंद पाडत शाळेच्या प्रांगणात तीन तास ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. बदली मागे घेतली नाही तर शाळेत येणार नाही अशी भूमिका घेत विद्यार्थी घरी निघून गेले. माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या मदतीने शाळेला प्रगतीकडे नेणाऱ्या मुख्याध्यापकांच्या बदली बाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.