लोकल समोरासमोर आल्याने मोटारमनच्या पोटात गोळा, सीएसएमटी सिग्नलवर लोकलचा वेग मंदावला!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तांत्रिक बिघाडामुळे दोन लोकल समोरासमोर आल्याच्या घटनेने अक्षरशः मोटारमनच्या पोटात गोळा आला आहे. सीएसएमटी येथील सिग्नल यंत्रणा गुंतागुंतीची आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत किंवा ट्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड होऊन आपलीही गाडी सीएसएमटीचा होम सिग्नल ओलांडून पुढे जाऊ नये, कोणतीही चौकशी मागे लागू नये म्हणून आज मोटारमन विशेष खबरदारी घेत मर्यादित वेगाने गाडय़ा चालवत होते. त्यामुळे लोकल गाडय़ा स्थानकात येण्यास काहीसा वेळ लागत होता.

मध्य रेल्वेकडून उपनगरीय मार्गावर दररोज 1810 लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्यामुळे मोटारमनला अचूकपणे सिग्नल बघून गाडय़ा चालवाव्या लागता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अनेक गाडय़ांची ये-जा असते. त्यामुळे येथील सिग्नल यंत्रणा गुंतागुंतीची आहे. त्यातच गुरूवारी फलाट क्रमांक तीनवर जाणऱ्या लोकलने 26 क्रमांकाचा सिग्नल ओलांडून फलाट क्रमांक चारच्या दिशेने गेल्याने दोन लोकल गाडय़ा समोरासमोर आल्या होत्या. मात्र मोटारमनने प्रसंगावधान राखत समोर लोकल दिसताच आपली लोकल गाडी थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या घटनेमुळे उपनरीय मार्गावर लोकल गाडय़ा चालवणाऱ्या मोटारमनमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आज सीएसएमटीच्या फलाट क्र. 3 आणि 4 वर जाणाऱ्या गाडय़ा येथे सावधपणे मर्यादित वेगाने चालवल्या जात होत्या अशी माहिती सुत्रांनी दिली. मात्र मध्य रेल्वेने त्याला दुजोरा दिला नाही.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून पाहणी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सिग्नल यंत्रणा गुंतागुंतीची आहे. त्यामुळेच दोन लोकल गाडय़ा समोरासमोर आल्याचे मोटारमनकडून सांगितले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सिग्नल क्र. 26 आणि 27 च्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

तीन सदस्यांची चौकशी समिती

दोन लोकल समोरासमोर आलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. ही समिती मोटारमान, गार्ड, कंट्रोलर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून सोमवारपर्यंत आपला अहवाल देणार आहे.