मानपानाचा विचार न करता मंदिर लोकार्पणाचा दिवस साजरा व्हावा! उद्धव ठाकरे घेणार काळाराम मंदिरात दर्शन

22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्गाटन केले जाणार आहे. मंदिर लोकार्पणाचा हा उत्सव शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिकमध्ये साजरा करणार आहे. काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गोदातीरी महाआरती करणार आहेत. 6 जानेवारी हा तमाम शिवसैनिकांसाठी आदरस्थानी असलेल्या माँसाहेब म्हणजेच मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिन. उद्धव ठाकरे यांनी मीनाताई यांना अभिवादन केले आणि यानंतर 22 आणि 23 जानेवारी रोजीच्या कार्यक्रमांबाबतची माहिती माध्यमकर्मींना सांगितली.

23 जानेवारी हा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन. या दिवशी नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 23 जानेवारीच्या संध्याकाळी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा होणार आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. इतकी वर्ष ज्या मंदिरासाठी संघर्ष करावा लागला त्या मंदिराचे लोकार्पण 22 जानेवारीला केले जाणार आहे. प्रभू रामचंद्र पंचवटीसही वास्तव्याला होते, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत राम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा केला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘राम मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम धार्मिक आणि अस्मितेचा असावा त्याला राजकीय रंग येऊ नये. मानपानाचा विचार न करता सगळ्यांनी हा दिवस साजरा केला पाहिजे’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.