काकानेच घात केला, एकाच कुटुंबातील तिघांची गोळ्या घालून हत्या

जमिनीच्या वादातून बऱ्याच वेळा वाद होतात आणि या वादांच रुपांतर कधी कधी हत्येसारख्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये होतं. पुण्यात जमिनीच्या वादातून नातलगांवरच ट्रॅक्टर चढवल्याची धक्कादायक घटना घडली होती. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे घडला असून एकाच कुटुंबातील तिघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलिहाबादच्या रहतमनगरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुख्य आरोपी लल्लन खान हा इतिहास लेखक असून त्याला लंडनमध्ये राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकाची जमीन ताब्यात घ्यायाची होती. कोर्टातून खटला निकाली काढल्यानंतर फरीद आणि लल्लन यांना नोटीस दिली होती आणि जमिनीच्या मोजमापासाठी बोलावले होते. ज्या जमिनीचे मोजमाप होणार होते त्याचा मालक लंडनमध्ये राहत होता. त्या जमिनीशेजारी फरीदची जमीन आहे. मात्र या जागेवरुन फरीद आणि लल्लन यांच्यात वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झाले.

त्यानंतर लल्लन खान आपल्या मुलासह रायफल घेऊन फरीदच्या घरी पोहोचला आणि लल्लनचा फरीदची पत्नी फरहीन आणि त्याचा मेहुणा ताज यांच्याशी पुन्हा एकदा वाद झाला. संतापलेल्या 70 वर्षाय लल्लन खानने आपली रायफल काढली आणि ताजवर गोळी झाडली. या वादात फरहीनचा 16 वर्षीय मुलगा हमजा ताजजवळ बसला असता लल्लनने हमजाच्या डोक्यात सुद्धा गोळी झाडली आणि त्यानंतर फरहीदलाही गोळी लागली.

या संपूर्ण घटनेबाबत फरीदने सांगितले की, लल्लन उर्फ सिराज हा इतिहासलेखक आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी यापूर्वीच अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. लल्लन हा नात्याने काका असल्याने, लल्लन आणि फराज त्यांच्याच चुलत बहिणीला आणि भावाला गोळ्या घालतील याची मला जराही कल्पना नव्हती.

फरीदच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी लल्लन आणि त्याचा मुलगा फराज तसेच दुचाकीवरून आलेल्या फुरकान आणि अशरीफ यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. लल्लनचा चालक अशरफी याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून पुढील तपास सुरू आहे.