दोन रोडरोमियोंना मुलीची ओढणी हवेत भिरकावणे पडले महागात, व्हायरल व्हिडीओनंतर केली अटक

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका मुलीची ओढणी खेचून हवेत भिरकावणे दोन रोडरोमिंयोंना चांगलेच महागात पडले आहे. त्यांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आणि व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी दोन्ही अटक केली असून त्यांच्याविरुद्ध अधिक तपास सुरू आहे.

संपूर्ण प्रकरण कानपूरच्या पनकी पोलीस ठाण्याजवळील आहे. जिथे शाळेतून परतणाऱ्या दोन विद्यार्थिनींसोबत रोडरोमियोंनी छेड काढली. ही घटना भाटिया तिराहेपासून स्टेशन बाजूच्या रस्त्याची आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये दोन विद्यार्थिनी शाळेतून परतत होत्या. दरम्यान दुचाकीवरून दोन चोरटे भरधाव वेगात आले आणि त्यांनी एका विद्यार्थिनीची ओढणी खेचून हवेत भिरकावली. पुढे गेल्यानंतर त्यांनी तिची ओढणी रस्त्यावर फेकून दिली.

ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाली. कोणीतरी त्या सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्ड सोशल मीडियावर शेअर केले आणि व्हिडीओ व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागला आणि पोलिसांनी लगेच त्याचा शोध सुरु केला. त्यांनी चौकशी केली असता आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही रोडरोमियोंना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित आणि अर्जुन अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी यापूर्वी मोबाईल चोरीही केली होती. मुलीची ओढणी हवेत भिरकावल्याप्रकरणी दोन्हा आरोपींना अटक केली आहे.