सोनिया गांधींसोबत वरूण गांधींचा फोटो असलेले पोस्टर व्हायरल करणाऱ्या काँग्रेस सचिवाविरोधात कडक कारवाई

प्रयागराज शहराचे काँग्रेस सचिव इर्शाद उल्लाह यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं. यामुळे तिथल्या राजकारणात खळबळ उडाली होती. उल्लाह यांनी व्हायरल केलेल्या पोस्टरमध्ये काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत वरुण गांधी यांचाही फोटो लावण्यात आला होता. राहुल आणि प्रियंका गांधींचे फोटो मात्र यातून गायब होते. ‘दु:ख भरे दिन बीते रे भैय्या सुखभरे दिन आयो रे’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.

उल्लाह यांच्या या पोस्टरमुळे काँग्रेस नेते संतापले असून त्यांनी उल्लाह यांना सचिव पदावरून तत्काळ दूर केलं आहे. याशिवाय त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्याचे 15 दिवसांत उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रयागराज शहराचे काँग्रेस अध्यक्ष नफीस अन्वर यांनी ही कारवाई केली असून त्यांनी 15 दिवसांसाठी उल्लाह यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपच्या नव्या कार्यकारिणीतून मनेका गांधी, वरुण गांधी यांना डावलले

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हिंसाचारावरून विरोधक केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप नेत्यांना धारेवर धरत आहेत. त्यातच भाजप खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूर घटनेवरून आक्रमक भूमिका घेत पक्षाला घरचा आहेर देणं त्यांना चांगलेच महागात पडले आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीत मनेका गांधी आणि वरुण या मायलेकांना डावलण्यात आले आहे.

जंबो कार्यकारिणीत 309 सदस्य

भाजप अध्यक्ष नड्डा यांनी 309 सदस्यांची जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात 80 सदस्य, 13 उपाध्यक्ष, 50 विशेष आमंत्रित आणि 179 स्थायी सदस्य असणार आहेत. भाजपशासीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राष्ट्रीय प्रवत्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांकडे या जबाबदाऱया

विनोद तावडे यांच्याकडे (हरियाणा), सुनील देवधर (आंध्र प्रदेश), पंकजा मुंडे (मध्य प्रदेश) प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रवत्ते म्हणून खासदार हिना गावित आणि सुनील वर्मा यांच्याकडे जबाबदारी असेल. तर महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मिथुन चक्रवर्ती, ज्योतिरादित्य शिंदे यांना संधी

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती, कॉँग्रेसमधून आलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह पक्षात तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून भाजपात आलेल्या चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली आहे. मात्र केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद व ज्येष्ठ नेते असूनही नारायण राणे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपमध्ये नारायण राणे वेटिंगवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून तब्बल 15 जणांना संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्याबरोबरच सुनील देवधर यांच्याकडे पुन्हा एकदा राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांना विशेष निमंत्रित म्हणून कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश आहे. मागील कार्यकारिणीत सचिव पदाची जबाबदारी असणाऱया विजया रहाटकर यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही.

लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी कार्यकारिणीत

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत गेल्या वेळी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता त्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे. राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून पहिले नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यानंतर आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे नाव आहे.