विजयसिंह मोहिते पाटील यांचं ठरलं, 14 एप्रिल रोजी ‘तुतारी’ हातात घेणार

भाजपने माढा लोकसभेची उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटील कुटुंबाने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 14 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील कुटुंबाचा दबदबा आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे गेली अनेक दशके राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषविले आहे. काही काळ ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांचा शब्द एकेकाळी प्रमाण होता. मात्र पक्षांतर आणि सत्ता बदल यामुळे मोहिते पाटील यांची राजकारणावरील पकड गेल्या काही वर्षापासून ढिली झालेली दिसत होती.

राजकारणावरील आपली पकड पुन्हा सिद्ध करण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबाने भाजप श्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊ केली. त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटलांनी शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत ते मात्र भाजप सोडणार नसल्याचे सांगितले जात आहे. 14 एप्रिलच्या पक्ष प्रवेशानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे माढामधून राष्ट्रवादी कडून उमेदवार असणार आहेत. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपल्या मागे ईडीच्या चौकशीचा सासेमिरा लागेल, याची भीती वाटत नाही का?या प्रश्नांवर जयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या सर्व संस्था या पारदर्शक कारभार करतात संस्थेत कसलाही घोळ नाही, त्यामुळे आपल्याला कारवाईची भीती नसल्याचे मोहिते यांनी सांगितले.