लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान; विदर्भात 43 लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारागोंदिया, गडचिरोलीचिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांत 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत 43 लाख 5 हजार 791 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदारांचा समावेश आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या मतदारसंघांमध्ये मतदान पेंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी कर्मचाऱयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून दुर्गम भागातील मतदान पेंद्रापर्यंत आवश्यक मतदान साहित्य पोहोच करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान पेंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हिलचेअरसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.

18 ते 19 वयोगटातील सर्वाधिक 31725 नवमतदार रामटेक मतदारसंघात आहेत. त्यापाठोपाठ भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघांचा नंबर लागतो. 20 ते 29 वयोगटांतील सर्वाधिक मतदारही रामटेक मतदारसंघात तर 30 ते 39 वयोगटातील सर्वाधिक मतदार नागपूर मतदारसंघात आहेत. 80 वर्षांवरील सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक मतदार नागपूर मतदारसंघात आहेत. मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.

अशा आहेत लढती

1. नागपुरात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे.

2. रामटेकमध्ये काँग्रेस सोडून मिंधे गटात आलेले राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात लढत होत आहे. येथे वंचित बहुजन आघाडीने किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला आहे.

3. चंद्रपूरला भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात सामना होत आहे.

4. भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी महायुतीचे सुनील मेंढे तर महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत होत आहे.

5. गडचिरोली-चिमूरमध्ये महायुतीने अशोक नेते तर महाविकास आघाडीने नामदेव किरसान हे मैदानात असून वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी हेदेखील नशीब आजमावत आहेत.