विंडीजची घसरगुंडी सुरू; हिंदुस्थानी गोलंदाजीपुढे 6 बाद 123 अशी  अवस्था

दुबळय़ा फलंदाजाच्या जिवावर फलंदाजीला उतरलेल्या यजमान वेस्ट इंडीजची घसरगुंडी पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रापासूनच सुरू झाली. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये संघाबाहेर असलेल्या रविचंद्रन अश्विनने 25 धावांत विंडीजचे 2 फलंदाज मैदानाबाहेर पाठवत त्यांची 4 बाद 68 अशी दुर्दशा केली. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांचा खेळ पाहाता ही कसोटीसुद्धा तीन दिवसांतच मान टाकण्याची चिन्हे दिसली आहेत.

आज कसोटीच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थानला पहिल्या यशासाठी तासभर वाट पाहावी लागली. वेस्ट इंडीजकडून  सलामीला आलेल्या टॅगनरीन चंदरपॉलला त्रिफळाचीत करत अश्विनने पहिले यश मिळवले आणि एक दुर्मिळ योगायोगही साधला. तो कसोटी इतिहासात पिता-पुत्राला बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला. अश्विनने टॅगनरीनचे वडील शिवनरीन चंदरपॉललाही बाद केले आहे. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकरच्या दुर्मिळ विक्रमाची आज विराट कोहलीने बरोबरी साधली. ज्याप्रमाणे सचिन मार्श पिता-पुत्रांच्या जोडीबरोबर खेळला होता तसेच आज चंदरपॉल पिता-पुत्रांच्या जोडीबरोबर खेळण्याचा योग त्याने साधला. कसोटी इतिहासात पिता-पुत्राच्या जोडीबरोबर खेळण्याचा दुर्मिळ योग सचिन आणि विराटलाच साधता आलेला आहे.

पहिली विकेट पडल्यानंतर वेस्ट इंडीजच्या फलंदाजांची घसरगुंडी सुरू झाली. मग दहा-पंधरा मिनिटांच्या फरकाने वेस्ट इंडीजचे आघाडीवीर हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर बाद होत गेले. कर्णधार क्रेग ब्रेथवेटही अश्विनचाच बळी ठरला. शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजानेही प्रत्येकी एक-एक विकेट घेत विंडीजच्या डावाला प्रारंभापासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. उपाहाराला 4 बाद 68 अशी धावसंख्या असलेल्या विंडीजला पाचवा धक्का जेवणानंतर लगेचच बसला. जडेजाने जोशुआ डासिल्वाला इशानच्या हाती झेल देण्यास भाग पाडले आणि यजमानांचा अर्धा संघ 75 धावांतच माघारी धाडला. पदार्पण करणाऱया ऑलिक ऍथनेजने विंडीजकडून सर्वाधिक धावा करत संघाची मजल शंभरी पलिकडे नेली.

हिंदुस्थानी संघात चार मुंबईकर

डब्ल्यूटीसी फायनलमधील अपयश विसरून हिंदुस्थानचा संघ गोलंदाजीला उतरला. आज मुंबईकर यशस्वी जैसवालने कसोटी पदार्पण केले. त्याचबरोबर यष्टिरक्षक म्हणून इशान किशनलाही पदार्पणाची संधी लाभली. यशस्वी हिंदुस्थानचा 307 वा तर इशान 308 वा कसोटीपटू ठरला. 306 वा कसोटी खेळाडू मुंबईकरच होता. सूर्यकुमार यादवनेही याच वर्षी कसोटी पदार्पण केले होते. आज यशस्वीच्या पदार्पणामुळे हिंदुस्थानी संघात रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर आणि यशस्वी जैसवाल असे चार मुंबईकर खेळत होते.